◆ आषाढी एकादशी ◆

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचे कारण मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते.
दक्षिणायन हि देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरु होते म्हणजेच देवांची रात्र सुरु होते, म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी (देवांच्या निद्रेची) एकादशी असे म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास सुरु होतो तो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे कि या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेष नागावर, योग निद्रेत जातात आणि कार्तिकी एकादशीला (प्रबोधिनी एकादशी) बाहेर येतात.

आषाढी एकादशीचे महत्व:
देवांच्या या निद्र कालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (असुरी शक्तींपासून) स्वतःचे सरंक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत करणे आवश्यक असते.

◆ पंढरपूरची वारी:
महाराष्ट्रात याला अनन्यसाधारण महत्व आहे कारण श्रीविष्णू व लक्ष्मीचे प्रतिरुप समजले जाणारे श्रीविठ्ठल-रुखमाईचे मंदिर पंढरपुर येथे आहे.दर आषाढी कार्तिकी एकादशीला तेथे वारी करण्याचा प्रघात आहे. जवळपास शेकडो वर्षापासून ही परंपरा येथे रुढ झाली आहे. सध्या आपण पाहतो तो आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा ज्यांनी सुरु केला ते हरिभक्त परायण हैबत बाबा आरफळकर हे प्रारंभी तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांच्या समवेतच पंढरपूरची वारी करीत होते. कालांतराने आळंदी व देहू येथून स्वतंत्र पालखी सोहळ्याचा प्रारंभ झाला. पायी वारीला जाणाऱ्या विष्णू भक्तांना वारकरी म्हटले जाते. सातत्य नियमितपणा हे जसे वारीचे मुख्य वैशिष्ट्य आहे तसे दुसरे म्हणजे पंढरीच्या विठ्ठलाची वारी हि एकट्याने नव्हे तर समूहाने करायची आहे. पंढरीची वारी हि सामुहिक भक्ती आहे. वारी हि साधना असून दिंडी हे एक साधन आहे. सर्व विठ्ठल भक्तांनी एकत्र जमून, अभंग गात, टाळ मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत नाचत आनंदाने पंढरीची वारी करण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे टाळ, मृदुंगासह, हाती भगवी पताका घेऊन अभंग गात, नाचत पंढरीस जाणाऱ्या समूहास दिंडी म्हटले जाते.
सोपे वर्म आम्हा सांगितले संती | टाळ दिंडी हाती घेउनी नाचा ||
पावसाळ्याचा आरंभ झालेला असतो, आपले शेत जोमाने वाढावे, घर धनधान्याने भरुन जावे यासाठी विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी लाखोंच्या संख्येने सर्व समुदयाचे लोक वारीला निघतात. या सर्वांचे दैवत आहे विठ्ठल आणि आदर्श आहे भक्तपुंडलिक….

◆ कथा :
पुंडलिक नावाचा एक विठ्ठलाचा निस्सीम भक्त होता. लहानपणापासून तो आपल्या आई-वडिलांची सेवा करता करता सतत देवाचे नाम:स्मरण करायचा. अशा या भक्ताला भेटण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वरच त्याच्या दाराशी गेला. पण त्या वेळी पुंडलिक आपल्या आजारी, वृद्ध मातापित्याची सेवा करण्यात दंग होता. विठ्ठल अंगणात आला, तेथे खूप चिखल असल्यामुळे पुंडलिकाने एक वीट त्याच्याकडे फेकली व म्हणाला , “देवा, तिथेच थांब! माझ्या आजारी आई-वडिलांना माझी गरज आहे, त्यांची सेवा पूर्ण करेपर्यंत वाट पहा.”
श्रीविठ्ठल कमरेवर हात ठेऊन वाट पाहू लागले. कितीतरी काळ लोटला पण पुंडलिक काही आलाच नाही…
कारण त्याचे मातापिता आणि त्यांची सेवा करता करता पुंडलिकही निजधामास गेला होता.!!!
अशा प्रकारे
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा…कर कटावरी ठेऊनिया…
त्यानंतर विठ्ठल-रुखमाई तिथेच शिळारुपात स्थिर झाले. तो दिवस होता आषाढी एकादशीचा.
अशाप्रकारे पुंडलिका सारख्या भक्तांची वाट पाहात प्रत्यक्ष परमेश्वर आजही पंढरपुरात उभा आहे अशी या वारकऱ्यांची मनोधारणा आहे, म्हणूनच थंडी, ऊन-पाऊस या कशाचीही तमा न बाळगता २१ दिवसांची पायी वारी करीत हे वारकरी पौर्णिमेला पंढरपुरात पोहोचतात. तेथील चंद्रभागा नदीमध्ये स्नान करुन पवित्र होतात. भगवंताचा आशिर्वाद घेऊन, पुण्याची शिदोरी घेऊन आपआपल्या गावी परततात.

◆ दिंडी माहात्म्य :
होय होय वारकरी | पाहें पाहें रे पंढरी ||
काय करावीं साधने | फळ अवघेची येणे ||
अभिमान नुरे | कोड अवघेची पुरे ||
तुका म्हणे डोळां | विठो बैसला सावळा ||
पंढरीची वारी हि ईश्वरी प्रेमाची एक विलक्षण अनुभती आहे. वारकरी संप्रदाय हा मानवी जीवनामध्ये परमेश्वरी प्रेमाची अनुभूती वारंवार घेऊन ते जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध व संपन्न कसे करावे याचा सुलभ राजमार्ग सांगणारा संप्रदाय आहे.
हिंदू धर्माच्या निरनिराळ्या अवस्थांतून परिणत होत आलेला तो परिपक्व स्वरूपाचा भाक्तीपंथ आहे.
पंढरीची वारी जयाचिये कुळी | त्याची पायधुळी लागो मज ||
असे वारीचे महात्म्य आहे. पंढरीच्या वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपुरला निघतात, यालाच वारी म्हणतात. आळंदीहून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका पैठण वरून नाथ महाराज, सासवड वरून सोपान काका व देहू येथून संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी पंढरपुरला निघते. त्यासोबत सर्व वारकरी अभंग म्हणत, विठ्ठल नामाचा गजर करीत टाळ मृदंगाच्या तालावर नाचत पायी जातात यालाच दिंडी असे म्हणतात.
वारकरी संप्रदाय हा लहान मोठा भेद मानत नाही, प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडून समोरच्या बद्दल आत्मीयता व आदर दाखवतो. सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन वारीला निघतात. रात्र झाली की जवळपासच्या गावात मुक्काम करतात. गावातील भाविक लोक दिंडीतील वारकऱ्यासाठी चहा फराळ व जेवणाची व्यवस्था करतात. जवळ अजिबात पैसे नसणारे भाविक देखिल या वारीमध्ये समाविष्ट होऊ शकतात हाच वारीचा महिमा आहे, येथे गरीब-श्रीमंत हा भेदच राहात नाही.

◆ पूजाविधी:
या दिवशी श्री विष्णूची श्रीधर ह्या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावतात. नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप १०८,१००८ तुलसी अर्चन, विष्णू सहस्त्रनाम पाठ, ज्ञानदेवांचा हरिपाठ, भजन, कीर्तन, आदि करण्याचा प्रघात आहे. या दिवशी सात्विक आहार घ्यावा, शक्यतो केवळ फलाहार व दूध एवढेच घ्यावे. काही लोक तर निर्जला उपवास करतात म्हणजे पाण्याचा थेंबही न पिता उपवास.
उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. दिवसभर भगवंताच्या सान्निध्यात राहणे म्हणजेच उपवास होय.चला तर मग.. या आषाढीला आपणही सत्याचरण, परोपकार व सात्विक आहार असा उपवास करुन पुण्यास पात्र व्हावे.

संग्रहित.. सोशल मीडिया


संकलन : न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा