मुंबई : महापालिकेने एका शिक्षकाला योगासनाचा व्हिडिओ शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर टाकण्यासाठी निलंबित केले आहे. हा शिक्षक स्वतःच्या घरातच रामदेव बाबा प्रमाणे छोटसे धोतर नेसून योगासन करत होता आणि तोच व्हिडिओ त्याने शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर पोस्ट केला.
या ग्रुपमध्ये इतर महिला शिक्षिका ही आहेत. याच महिला शिक्षकांनी या व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे. पण हा आक्षेप केवळ योगासनाच्या व्हिडिओसाठी नाही. तर हा शिक्षक अनेक अश्लील व्हिडिओ शिक्षकांच्या या ग्रुपवर टाकत असतो, असे या शिक्षकांचे म्हणणे आहे.
या शिक्षकाला वारंवार सांगूनही असे आंबट शौकिन व्हिडिओ ग्रुपवर टाकणे थांबविले नाही. तेव्हा शिक्षकांनी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्याकडे तक्रार केली.
मंगेश सातमकर यांनीही शिक्षण विभागाला या शिक्षकावर कारवाई करण्यास सांगितले. परंतु दोन वेळा तक्रार करूनही पालिकेच्या शिक्षण विभागाने कारवाई केली नाही.
पालिका शिक्षण विभागाने या शिक्षकाविरुद्ध आता आलेल्या तक्रारीची गंभीर दाखल घेत निलंबित केले आहे.
सध्या या शिक्षकाची चौकशी सुरु आहे. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित व्यक्तीला नोकरीमधून बडतर्फ केले जाईल, अशी माहिती अंजली नाईक यांनी दिली आहे.