मुंबई, दि.२१ मे २०२०: सध्या लॉकडाऊनच्या काळात कोरोना योध्दा म्हणून लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस यांच्याबरोबरीने पोलीस कर्मचारी प्राणाची बाजी लावून काम करत आहेत. या लढाईत अनेकांनी आपले प्राणही गमावले आहे. या ड्यूटी करणाऱ्या पोलिसांच्या कामाचे आपण काही तरी कौतुक करावे, अशी भावना मनात ठेवून मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी पोलिसांना चक्क आमरस पुरीचे जेवण दिले आहे. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या कामाची सध्या चांगलीच चर्चा सूरु आहे.
सराफ दाम्पत्य सध्या मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्य करत आहेत. हा भाग ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्याशी संपर्क साधून अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना आमरस पुरीचे जेवण देण्याची इच्छा व्यक्त केली होती. पोलीस अधिकाऱ्यांकडून याला परवानगी मिळाल्यानंतर सर्व पोलिसांना आमरस पुरीचे जेवण देण्यात आले.
यावेळी सराफ म्हणाले की, पोलीस सध्याच्या खडतर परिस्थितीत जे काम करत आहेत, ते कौतुकास्पद आहे. तुमच्याबद्दल मनात आम्हाला कायम आदर होताच आणि आता तर तो द्विगुणित झालाय ‘, अशा शब्दांत सराफ दाम्पत्याने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.
मे महिना म्हटले की मराठी माणसाला आंब्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मात्र, ड्यूटीवर गुंतलेल्या पोलिसांना सध्या तरी साधे जेवण मिळाले तरी खूप असे म्हणायची वेळ आली आहे. या आमरस पुरीच्या जेवणाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: