नवी दिल्ली, ३० सप्टेंबर २०२२ : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी आपण कालच्या प्रकाराबद्दल माफी मागितल्याचेही सांगितले. मी मुख्यमंत्री राहिल की नाही हे मला माहीत नाही. याचा निर्णय सोनिया गांधी घेतील असे गेहलोत म्हणाले आहेत.
तसेच अशोक गेहलोत पुढे बोलतात की मी काँग्रेसमध्ये एका प्रामाणिक सैनिकाप्रमाणे काम करत आहे. पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवून आजपर्यंत अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. काँग्रेस पक्षाचा एका ओळीचा प्रस्ताव मी पारित करू शकलो नाही, याचे दु:ख मला आयुष्यभर असेल. राजस्थानमध्ये घडलेल्या प्रकाराची मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी घेत मी सोनिया गांधींची माफी मागितली आहे. असे गेहलोत यांनी स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांच्या नावाला काँग्रेस नेतृत्वाची सर्वाधिक पसंती होती. पण आता या शर्यतीतून गेहलोत यांनी माघार घेतली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या या निवडणुकीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असतानाच अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर दुसरीकडे लोकसभा सदस्य शशी थरूर ३० सप्टेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे आता शशि थरूर आणि दिग्विजय सिंह यांच्यापैकी कोण अध्यक्ष होणार हे राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर समोर येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे