Ind vs Pak Asia Cup 2022, ३ ऑगस्ट २०२२: क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी संध्याकाळी ही घोषणा केली. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ २८ ऑगस्टला आमनेसामने येणार आहेत.
यावेळी आशिया चषक टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. येथे पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात दुबईत होणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवारी (२८ ऑगस्ट) आमनेसामने येणार असताना, हा सामनाही दुबईत होणार आहे.
या स्पर्धेत २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत गट सामने आणि त्यानंतर सुपर-४ च्या संघांचे सामने ३ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या कालावधीत होतील. तर आशिया कप २०२२ चा अंतिम सामना रविवारी ११ सप्टेंबर रोजी होणार आहे.
आशिया कप २०२२ मधील भारताचे सामने
• २८ ऑगस्ट – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
• ३१ ऑगस्ट – भारत विरुद्ध पात्रता संघ, दुबई
गेल्या वर्षीच्या T20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचा सामना पहिल्यांदाच पाकिस्तानशी होणार आहे. तो सामनाही यूएईमध्येच खेळला गेला होता. ज्यामध्ये पाकिस्तानने भारतावर १० विकेट्सने मात केली.
यापूर्वी ही स्पर्धा श्रीलंकेत होणार होती, परंतु श्रीलंकेतील खराब परिस्थितीमुळे ही स्पर्धा तेथे आयोजित करण्यात आली नाही. अशा परिस्थितीत, यानिमित्ताने ते यूएईला हलवण्यात आले आहे. मात्र, येथेही या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंका क्रिकेटच राहणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे