पुणे, १० ऑगस्ट २०२३ : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेतील राऊंड रॉबिन लीगमधील अखेरच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय संघाने पाकिस्तानचा ४-० ने पराभव केला आहे. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर भारताला कट्टर प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखण्यात यश आले. यासह संघाने उपांत्य फेरीतही मजल मारली आहे.
भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने ( १५व्या आणि २३ व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरवरून दोन गोल केले. जुगराज सिंगने ३६ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. आकाशदीप सिंगने ५५ व्या मिनिटाला मैदानी गोल केला.
भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, तर जपान चौथ्या स्थानावर राहून अंतिम चारमध्ये पोहोचला आहे. शुक्रवारच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना जपानशी होईल, तर पहिला उपांत्य सामना दुसऱ्या स्थानावर असलेल्या मलेशिया आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या दक्षिण कोरियामध्ये होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड