अर्जेंटिना विश्वविजेता

मेस्सीची स्वप्नपूर्ती, ३६ वर्षांनंतर साकारले स्वप्न

दोहा, १९ डिसेंबर २०२२ : कतारमध्ये खेळल्या गेलेल्या फिफा विश्वकरंडक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना रोमहर्षक ठरला. मेस्सी आणि एमबाप्पेनेच्या कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिना आणि फ्रान्सने प्रत्येकी ३-३ गोल केल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये पोचला. त्यामुळे सामन्याची रंगत वाढली. या अटीतटीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या मेस्सीने २ आणि एमबाप्पेने २ असे एकूण ४ गोल करीत पेनल्टी शूटआऊटमध्ये इतिहास रचला आणि तब्बल ३६ वर्षांनंतर अर्जेंटिना विश्वविजेता ठरला.

लुसैल स्टेडियममध्ये रंगलेली ही अंतिम लढत रोमांचक ठरली. विशेष म्हणजे लिओनेल मेस्सीचे हा विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न होते. त्याने अखेर ऐतिहासिक कामगिरी करीत विश्वकरंडक जिंकण्याचे स्वप्न साकारले. अर्जेंटिनाने सामन्यात ७९ व्या मिनिटापर्यंत २-० अशी आघाडी घेत सामना जवळपास खिशात टाकला होता; मात्र फान्सच्या किलियन एम्बाप्पेने एका मिनिटाच्या अंतरावर २ गोल करीत सामना बरोबरीत आणला. सामना पूर्णवेळ २-२ असा बरोबरीत राहिल्याने सामना अतिरिक्त ३० मिनिटांत गेला.

यातही पहिली १५ मिनिटे तोडीस तोड खेळ झाला. त्यानंतर मेस्सीने पुन्हा आपली जादू दाखवत १०८ व्या मिनिटाला अर्जेंटिनासाठी दुसरा गोल केला; मात्र ११८ व्या मिनिटाला फ्रान्सच्या एम्बाप्पेने पेनाल्टीवर तिसरा गोल करीत सामना पुन्हा ३-३ असा बरोबरीत आणला. अखेर सामना पेनाल्टी शूटआऊटवर गेला. तेव्हा एम्बाप्पेने पहिली पेनाल्टी गोल करीत १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर मेस्सीने पहिली पेनाल्टी अचूक मारत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर पॉल डयबालाने अर्जेंटिनासाठी गोल करीत २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर फ्रान्सने तिसरी पेनाल्टी मिस केली; मात्र अर्जेंटिनाने तिसरी पेनाल्टी मारत ३-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर फ्रान्सच्या मुआनीने गोल केला; मात्र अर्जेंटिनाच्या संघाने आणखी एक गोल मारत ४-२ ने विश्वकरंडकाला गवसणी घातली आणि तब्बल ३६ वर्षांनी विश्वकरंडकावर आपले नाव कोरले.

मेस्सीचा मोठा वाटा
विश्वकरंडक विजयात लिओनेल मेस्सीचा मोठा वाटा आहे. त्याने स्पर्धेत ६ गोल करीत विश्वकरंडक विजयाचे स्वप्न साकार केले. विशेष म्हणजे १९८६ च्या विश्वकरंडक
विजयानंतर एका वर्षाने म्हणजे १९८७ मध्ये जन्मलेल्या लिओनेल मेस्सीने अखेर ३६ वर्षांनंतर पुन्हा एकदा अर्जेंटिनाला विश्वविजेता बनविले.

३६ वर्षांपूर्वी मॅराडोनाने जिंकून दिला होता विश्वकरंडक
अर्जेंटिनाचा दिवंगत स्टार फुटबॉलर डिएगो मॅराडोना याने अर्जेंटिनाला १९८६ मध्ये विश्वकरंडक जिंकून दिला होता. त्यानंतर अर्जेंटिनाला विश्वकरंडकाने हुलकावणी दिली होती; मात्र अखेर ३६ वर्षांनी हा सुवर्णयोग आला. अर्जेंटिनाने फ्रान्सचा अंतिम सामन्यात ४-२ असा पराभव करीत तिसऱ्यांदा विश्वकरंडकावर नाव कोरत अर्जेंटिनाला विश्वविजेता बनवले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा