पुणे, १६ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भगवान शंकराचे ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकरबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी वृत्तपत्रात जाहिरात देऊन भगवान शिवाचे सहावे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात नसून त्यांच्या आसाममध्ये असल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी विरोधकांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मंगळवारी बोरिवली परिसरातील कार्यक्रमादरम्यान शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे म्हणाले, की देशात आधीच एवढा वाद आहे; मात्र आता भीमाशंकरबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. यावर आमचे मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. त्याचवेळी ‘राष्ट्रवादी’च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून टर उडवली आहे. शिंदे बंड करून महाराष्ट्रातील आपल्या ४० आमदारांसह गुवाहाटीला गेले, तेव्हा मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांनी त्यांचे पूर्ण स्वागत केले होते, त्यादरम्यान ते भगवान शिवाचे ज्योतिर्लिंग भीमशंकरला भेट देऊनही परतले नाहीत. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर बचावासाठी पुढे आले. त्यांनी सांगितले, की महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्राची बदनामी करण्यात व्यस्त आहेत.
काँग्रेसचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष भाई जगताप म्हणाले, की भाजपमध्ये रामाचा मुद्दा संपला आहे. त्यामुळे त्यांनी आता भगवान शिवाचा मुद्दा समोर आणावा. त्याचवेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे म्हणाल्या, की महाराष्ट्रातील उद्योग आता इतर राज्यांत गेले आहेत. आता लोक मंदिरातही जायला लागले आहेत, हे असेच सुरू राहिले तर एक दिवस महाराष्ट्रावरही कोणी हक्क सांगेल.
‘राष्ट्रवादी’चे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार म्हणाले, की आसाममध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे ते आमच्या ज्योतिर्लिंगावर दावा करीत आहेत. याला आमचा विरोध आहे. सहावे ज्योतिर्लिंग हजारो वर्षांपासून येथे आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे, असा दावा करून आसामच्या मुख्यमंत्र्यांना काय सिद्ध करायचे आहे. इतर मुद्द्यांवर राजकारण करा. बंडानंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांची चांगलीच काळजी घेतली. शिंदे गप्प का?
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड