यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या

अहमदनगर, १ डिसेंबर २०२०: यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे अनेकांना मोठा धक्का बसला असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

रेखा जरे, त्यांचा मुलगा, त्यांची आई तसेच डॉ. माने या पुण्याहून काम उरकून येत असताना जतेगाव घाटात ही घटना घडली. हे सर्वजण एका चारचाकी वाहनात येत होते. शिरूर च्या पुढे आल्यावर एका दुचाकीने ओव्हरटेक करून पुढे जात असताना त्यांच्या गाडीला कट मारत धक्का दिला. यानंतर ही दुचाकी जरे यांच्या गाडीला आडवी झाली. त्या वादातूनच रेखा जरे यांच्या मानेवर वार करण्यात आले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती जरे यांच्या मुलाने पोलिसांना दिली आहे. दुचाकीवर दोन जण होते. ते नेमके कोण होते, याबाबत अधिक तपशील अजून मिळालेला नाही.

रेखा जरे यांच्याबाबत माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. परंतु त्यांना रुग्णालयात भरती करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता अशी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्या ३९ वर्षाच्या होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा