मुंबई , 26 जून 2022: विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेतील 40 आमदार आपल्या सोबत घेतले आहेत. गेल्या पाच-सहा दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष पहायला मिळत आहे. एकीकडं एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना घेऊन गुवाहाटीमध्ये थांबले आहेत तर दुसरीकडं शिवसेनेकडून आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. आता तर एकनाथ शिंदे गटाचा गुवाहाटी मधील मुक्काम वाढला आहे. कारण होटेल बुकिंग आणखीन दोन दिवसांनी वाढवण्यात आलंय.
तर दुसरीकडे राज्यात शिवसेनेकडून बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना कारवाई करताना दिसत आहे. याआधी शिवसेनेने 16 आमदारांचं सभासदत्व रद्द करावं अशी विनंती उपसभापतींकड केली होती. याला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, असं प्रत्युत्तर दिलं होतं.
आता या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या समस्या वाढताना दिसत आहे. या सर्व घडामोडी घडत असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. नोटिशीचे उत्तर न दिल्यास या आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. या 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. याच मागणीची दखल घेत झिरवळ यांनी ही नोटीस बजावली असून त्यांना 48 तासांचे अल्टिमेटम दिले आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील बंडखोर आमदार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे