मुंबई,८ जुलै २०२३ : अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. तर त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही दिसत आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. याचदरम्यान उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी मुंबईमध्ये घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये, अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयावरून टोमणा मारला.
त्यावर शरद पवार यांनी दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक झाल्यावर उत्तर दिले होते. माझे वय ८२वर्षे असो वा ९२वर्षे असो, त्याने काहीही फरक पडत नाही. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांच्या वयावरून सुरू असणाऱ्या राजकारणावर मोठे वक्तव्य केले आहे. तसेच त्यावरून त्यांनी आरोप देखील केले आहेत.
यावेळी फडणवीस म्हणाले, शरद पवार यांच्या वयावरून त्यांच्या समर्थकांकडून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार १०० वर्षे जगावेत. ते हवे तितके दिवस राजकारणात रहावेत असे म्हटले आहे. तर त्यांच्या वयावरून सध्या त्यांना सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे फडणवीस म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर