नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीलाच शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिले आश्वासन

मुंबई, ८ सप्टेंबर २०२२ ; शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये १९ मंत्र्यांचा समावेश करून पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. तेव्हापासूनच मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या आमदारांसह, अनेक जण दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे नजरा लावून आहे. काही दिवसापूर्वी भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले होते. तर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच आमदारांच्या बैठकीमध्ये नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीलाच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

गणेशोत्सव संपताच पितृपक्ष सुरू होत आहे यानंतर नवरात्र उत्सवामध्ये मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीलाच म्हणजे २६ किंवा २७ सप्टेंबरला विस्तार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इच्छुक आमदारांना सांगितले. यामुळे मंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केल्याचे दिसत आहे.

शिंदे सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लवकरच होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतेच आपल्या शासकीय निवासस्थानी सर्व आमदारांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ही हजेरी लावली होती. याच दिवशी मंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांच्या गटाची स्वतंत्र बैठक घेतली होती. स्नेहभोजना अगोदर अशा दोन टप्प्यांमध्ये बैठका घेण्यात आल्या.

मंत्रिमंडळ विस्तारा बाबत सर्व चर्चा झाली आहे.याबाबतीत आता लवकरच घोषणा केली जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची तयारीही पूर्ण झाली असून, आता यासंदर्भात कोणतेही अडथळे राहिले नाहीत. एखाद दुसऱ्या मुद्द्या संदर्भात चर्चा सुरू आहे. त्यावरही तोडगा निघेल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा