नवी दिल्ली, १५ सप्टेंबर २०२०: मंगळवारी चीनशी झालेल्या तणावाबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत एक निवेदन दिलं. यावेळी राजनाथ सिंह यांनी एलएसीवर काय परिस्थिती आहे हे सांगितलं. संरक्षणमंत्री म्हणाले की लडाखमध्ये आपण एक आव्हान पार करत आहोत, परंतु आपण प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहोत.
संरक्षणमंत्री म्हणाले की, २९-३० ऑगस्ट रोजी रात्री चीननं पँगोंग भागात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या सैन्यानं चीनचे हे प्रयत्न अपयशी केले. राजनाथ सिंह म्हणाले की, मी सभागृहाला आश्वासन देऊ इच्छितो की सीमा सुरक्षित आहेत आणि आमचे सैनिक मातृभूमीच्या रक्षणामध्ये सज्ज आहेत. सीमा भागात सशस्त्र सेना आणि आयटीबीपी त्वरित तैनात करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दशकांत चीननं मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा सुरू केल्या आहेत. त्याला उत्तर म्हणून सरकारनं सीमा क्षेत्र विकासासाठी अर्थसंकल्पातही वाढ केलीय.
राजनाथ सिंह म्हणाले की, १९९० ते २००३ पर्यंत दोन्ही देशांमध्ये संयुक्त करार करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु त्यानंतर चीन या दिशेनं पुढं जाऊ शकला नाही. एप्रिल महिन्यापासून लडाखच्या सीमेवर चिनी सैन्य आणि शस्त्रास्त्रांमध्ये वाढ झाली होती. चिनी सैन्यानं आपल्या पेट्रोलिंगमध्ये अडथळा आणला, त्या कारणामुळं आज ही स्थिती निर्माण झाली आहे.
संरक्षणमंत्री म्हणाले की आमच्या शूर सैनिकांनी चिनी सैन्याचं मोठं नुकसान केलं आहे आणि सीमेचं रक्षणही केलं आहे. आमच्या सैनिकांनी पराक्रमाची आवश्यकता असलेल्या ठिकाणी शौर्य दाखविले आणि जिथं शांतता आवश्यक तिथं शांतता ठेवली.
राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितलं की, दोन्ही सैन्यानं सीमेवर शांतता ठेवणे गरजेचं आहे. त्याबरोबरच सीमेवरील स्थिती देखील सामान्य असणं गरजेचं आहे. चीनसुद्धा असंच म्हणतो, परंतु त्यानंतर २९-३० ऑगस्टच्या रात्री चीननं पुन्हा पँगोंगमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या सैन्यानं चीनला रोखलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे