दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर बांगलादेशचा पहिला डाव २२७ धावात संपुष्टात; भारताच्या १९ धावा

7

पुणे, २३ डिसेंबर २०२२ : भारत आणि बांगलादेश संघांत सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात ७३.५ षटकांत सर्वबाद २२७ धावा केल्या. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावाला सुरवात केली आहे.

भारताने दिवसाची १४ षटके शिल्लक असताना आपला पहिला डाव खेळण्यास सुरवात केली. सालामीवीर के. एल. राहुल आणि शुभमन गिलने भारतीय संघाच्या पहिल्या डावाला सुरवात केली आहे. ज्यामध्ये पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तोपर्यंत भारतीय संघाने ८ षटकांत बिनबाद १९ धावा केल्यानंतर पंचांनी अंधूक प्रकाशामुळे सहा षटके शिल्लक असतानाच दिवसाचा खेळ थांबवला. भारतीय संघ अजून २०८ धावांनी पिछाडीवर आहे; तसेच भारतीय फलंदाज के. एल. राहुल ३ आणि शुभमन गिल १४ धावांवर नाबाद आहेत.

बांगलादेश संघाकडून मोमिनुल हकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने १५७ चेंडूचा सामना करताना ८४ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने १२ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याचबरोबर मुशफिकर रहीम २६, लिटन दास २५ आणि शांतोने २४ धावांचे योगदान दिले. त्यामुळे बांगलादेश संघाला दोनशे धावांचा टप्पा पार करता आला. याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना काही खास कामगिरी करताना आली नाही. ज्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.

भारताकडून गोलंदाजी करताना उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. उमेश यादवने १५ षटके गोलंदाजी करताना, २५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अश्विनने देखील ७१ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. तसेच १२ वर्षांनंतर कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या जयदेव उनाडकटने देखील २ विकेट्स घेतल्या.

दरम्यान, बांगलादेश संघ दोन बदलांसह या सामन्यात उतरला असून, भारताने कुलदीप यादवच्या जागी जयदेव उनाडकटचा संघात समावेश केला आहे. कुलदीपने मागच्या सामन्यात चेंडू आणि बॅटने आश्चर्यकारक कामगिरी केली आणि त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले होते. भारतीय कर्णधार के. एल. राहुलने नाणेफेकीच्या वेळी सांगितले, की कुलदीपला संघाबाहेर पाहून वाईट वाटले; पण उनाडकटसाठी ही सर्वोत्तम संधी आहे. जयदेव उनाडकट भारतासाठी पहिला कसोटी सामना खेळत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा