नाशिक, २२ फेब्रुवारी २०२३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रश्न भेडसावत आहेत. या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यावर उतरली आहे. नाशिकमधील वणी येथे ‘स्वाभिमानी’चे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. आंदोलनकरांनी शिर्डी-सुरत महामार्गावर प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात रास्ता रोको केला आहे.
शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्य, द्राक्षांच्या माळा; तसेच जिल्हा बँकेच्या नोटिसांच्या माळा घातळ्या आहेत; तसेच शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे, द्राक्षे फेकत व जिल्हा बँकेच्या नोटिसा जाळत निषेध नोंदविला आहे. याप्रसंगी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत कड, गंगाधर निखाडे, संतोष रेहरे, विलास भवर यांच्यासह मोठ्या संख्यने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
या आंदोलनात प्रामुख्याने या मागण्या केल्या आहेत, की बुलडाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर अमानूष लाठीचार्ज ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी केला त्यांची खातेनिहाय चौकशी करावी. सोयाबीन, कपाशी, कांदा द्राक्ष यांसारख्या अनेक पिकांचे बाजारभाव पडले आहेत. सरकारने हस्तक्षेप करून हे बाजारभाव पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावेत या वह इतर प्रमुख मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर रास्ता रोको आंदोलन करीत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर