महाड, २५ ऑगस्ट २०२१ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘कानाखाली मारली असती’ असे वक्तव्य करून केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच अडकले आहेत. रत्नागिरी न्यायालयातून अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले आणि काही काळानंतर त्यांना अटकही झाली. आता या कारवाईवर राणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की उद्धव ठाकरे मला घाबरतात, म्हणून ते असं करत आहेत. मी काही चुकीचे बोललो नाही. आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार करताना राणे म्हणाले की जर मी तिथे असतो तर मी त्यांना कानाखाली मारली असती. राणे म्हणाले की त्या दिवशी मी इथे प्रत्यक्षात असलो असतो तर मी असे केले असते हे मी बोललो. कारण मी प्रत्यक्षात तिथे नव्हतो त्यामुळे माझा बोलण्याचा आणि प्रत्यक्ष करण्याचा वेगळा अर्थ आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करताना राणे म्हणाले की, त्यांचा मुलगा सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सलियन या प्रकरणात सामील आहेत. मग त्यांना अटक झाली नाही तर मग मला अटक का केली जात आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. या अटकेनंतर केंद्र विरुद्ध महाराष्ट्र सरकार असू शकते का या प्रश्नावर ते पुढे म्हणाले की, त्यांची केंद्राशी लढाई होऊ शकत नाही. राज्य केंद्राशी लढू शकत नाही. राणे म्हणाले की, मी आत्ता काहीही बोलणार नाही, जे हे करतील त्यांच्यावर आम्ही निश्चितपणे पुन्हा कारवाई करू.
राणेंनी आधीच सुशांत सिंह प्रकरणात उद्धव यांना लक्ष्य केले आहे.
अटक झाली तेव्हा नक्की काय घडलं याबद्दलही नारायण राणेंनी यावेळी भाष्य केलं आहे. “गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथे मी दुपारी तीन सव्वा तीनच्या सुमारास जेवत असतानाच अचानक तिथे डीसीपी आले आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे असं मला सांगितलं. मी त्यांना नोटीस दाखवा असं म्हटलं. तर त्यांच्याकडे नोटीस वगैरे नव्हती. त्यांनी जबरदस्तीने मला अटक करुन इथे संगमेश्वर पोलीस स्थानकामध्ये आणलं. त्यानंतर ते एका रुममध्ये गेले आणि दोन तास बाहेर आले नाहीत. मला त्यांचा हेतू चांगला वाटला नाही. माझ्या जीवाला धोका असल्याप्रमाणे त्याच्या हलचाली होत्या. नंतर तिथे अनेक अधिकारी आले. आता मला कोकणातील महाड येथे नेलं जात आहे,” असं राणे म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे