नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अथर्व लोहार आणि देवेश भईया या दोन बालकांना बुधवारी(दि.२२) रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ ने सन्मानित करण्यात आले.
अथर्वचा कला व संस्कृती क्षेत्रातील योगदानासाठी तर देवेशचा गणितातील सृजनात्मक कार्यासाठी सन्मान झाला. प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या पथसंचलनात हे दोघे सहभागी होणार आहेत.
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी, राज्यमंत्री देबाश्री चौधरी आणि सचिव रवींद्र पवार उपस्थित होते.
पदक, एक लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत गेल्या वर्षीपासून हे पुरस्कार दिले जात आहेत. बुधवारच्या सोहळ्यात देशातील ४९ बालकांचा ‘बाल शक्ती पुरस्कारा’ न गौरव झाला.
अथर्व तबला वादनात, तर देवेश गणितात सरस
अथर्व हा मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण येथील असून सध्या अंबरनाथमध्ये राहतो. त्याने तबला वादनात जागतिक पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल केले. तसेच देवेशने गणितात सृजनात्मक योगदान दिले आहे. इग्नायटेड माइंडलॅब परीक्षेत त्याने सर्वाधिक गुण मिळवले आहेत.