पुणे : सध्या संपूर्ण राज्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. बाजारात कांद्याची दहा ते पंधरा रुपयांची वाढ झाली आहे. असे येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.
पुणे येथील मार्केट यार्डात कांद्याला प्रतिदहा किलोस ५०० ते ६०० रुपये भाव मिळत आहे. रविवारी बाजारात ८० ट्रक कांद्याची आवक झाल्याची माहिती विभाग प्रमुख बाबा बीबवे यांनी दिली. तर किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार कांदा ७० ते ८० रुपये किलो झाल्याची माहिती किरकोळ विक्रेत्यांनी दिली.
सध्या बाजारात कर्नाटक, मध्य प्रदेशातून नवीन कांदा येत आहे. परंतु तो चांगल्या दर्जाचा नसल्याचे समोर आले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे लागवड केलेला नवीन कांदा पीकही जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जुन्या मागणीत वाढत होत असल्याने दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. असे येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले.
कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे कांदा घेणे आता परवड नाही. परंतु ती अत्यावश्यक गरज असल्याने खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
– साक्षी कुलकर्णी, गृहिणी