ATS-ICG ची समुद्रात मोठी कारवाई

5

नवी दिल्ली, ८ ऑक्टोंबर २०२२ : भारतीय तटरक्षक दल ICG आणि गुजरात ATS यांच्या संयुक्त कारवाईला ड्रग्जच्या विरोधात मोठं यश मिळालंय. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकानं (ATS) संयुक्त कारवाईत आज आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ ५० किलो हेरॉईन ड्रग्ज घेऊन जाणारी पाकिस्तानी बोट पकडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या या बोटीतून ५० किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं असून त्याची किंमत ३५० कोटी रुपये आहे. बोटीवरील ६ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या ICG अधिकाऱ्यांनी माहिती देत सांगितलं आहे की, भारतीय तटरक्षक दलाला पाकिस्तानी बोटीची माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आज सकाळी ‘अल सक्र’ या पाकिस्तानी बोटीवरील ३५० कोटी रुपयांचं हेरॉइन जप्त करत ही करवाई केली आहे. पुढील तपासासाठी पाकिस्तानी बोट कच्छ येथे जखाऊ बंदरात आणण्यात येत आहे.

भारतीय तटरक्षक दलाची गेल्या वर्षभरातील एटीएससोबतची ही सहावी कारवाई आहे. त्याचबरोबर गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा एटीएसला अंमली पदार्थ विरोधी कारवाईला यश मिळाले आहे. यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानी बोटीतून सुमारे २०० कोटी रुपयांचे ४० किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. एवढंच नाही तर यादरम्यान ६ जणांना अटक करण्यात आली, जे पाकिस्तानी असल्याचं सांगण्यात येत आहेत. तर कोचीमध्ये यापूर्वी NCB आणि ICG नं मिळून एक पाकिस्तानी बोट पकडली होती, त्यामध्ये करोडोंचं ड्रग्ज सापडलं होतं.

या मोहिमे दरम्यान खराब हवामानानंतरही गुजरात ATS – ICG नं हे मिशन पूर्ण केल्याचं सांगितलं जात आहे. ही बोट आणि ड्रग्जशी संबंधित अधिक माहितीसाठी एजन्सीनं तपास सुरू केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा