यवतमाळ, ४ जानेवारी २०२३ : जागेच्या वादातून संतापलेल्या पुतण्याने लोखंडी रॉडने काकाला बेदम मारहाण केली. वडिलांना वाचविण्यासाठी मुलगा मध्ये आला असता, त्याच्यावरही रॉडने डोक्यावर प्रहार केले. यात मुलगा राहुल नरेंद्र पाली (वय २४, रा. शारदा चौक) बार झाला. तर वडील नरेंद्र जगन्नाथ पाली (वय ५५) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही थरारक घटना यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा मार्गावर घडली.
याविषयी अधिक माहिती अशी,की श्री. नरेंद्र पाली यांचे टायर रिमोल्डींगचे दुकान आहे. त्याला लागूनच घर होते. या घराच्या जागेवरूनच वाद सुरू होता. नरेंद्र पाली यांच्या शेजारी त्यांचा मोठा भाऊ जगदीश पाली यांच्या परिवाराचे वास्तव्य आहे. नरेंद्र पाली यांनी आपले जुने घर तोडून दुकानाला लागून बांधकाम सुरू केले होते. यावेळी बोअरवेल खोदण्याचे काम सुरू असताना. अचानक तेथे पुतण्या सूरज जगदीश पाली हा आला. आणि त्याने जागेवरून वाद घालत हातातील लोखंडी रॉडने नरेंद्र पाली यांच्यावर प्रहार केला. हे बघून वडिलांना वाचविण्यासाठी राहुल पुढे आल असता, राहुलच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले. यात राहुल रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळला. नंंतर आरोपीने नरेंद्र पाली यांच्या चेहऱ्यावर वार केले. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केले. तर नरेंद्र पाली यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. याप्रकरणी नरेंद्र पाली यांची पत्नी रजनी पाली यांनी जागेच्या वादातून हा हल्ला केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर