मणीपूर, २९ सप्टेंबर २०२३ : दोन विद्यार्थ्यांच्या हत्येवरुन सुरू असलेला मणीपूरमधील हिंसाचार सुरूच असून, नीदर्शकांनी मणीपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंग यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तत्पर सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करून हल्लेखोरांना घटनास्थळावरून पिटाळून लावले. याच दरम्यान पोलीस महासंचालकांच्या कार्यालयावर हल्लाबोल झाला असून, अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे.
मनिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये तीन मे पासून सुरू असलेला हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन बेपत्ता विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा हिंसाचार उसळला आहे. आज भाजप कार्यालयाला आग लावण्यात आली. अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ केली आहे. पोलीस महासंचालकांच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली गेली.
पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. गेल्या चोवीस तासांत राज्यातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. हिंसाचाराशी संबंधित घटनाप्रकरणी अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. मणिपूरमधील डोंगराळ भागात अफ्स्पा हा विशेष लष्करी कायदा आणखी सहा महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर