औरंगाबाद महानगरपालिकेचे झाले छत्रपती संभाजीनगर; महानगरपालिका आयुक्तांनी काढले परिपत्रक

छत्रपती संभाजीनगर, ३ मार्च २०२३ : गेल्या ३४ वर्षांपासून औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करावे, या विषयावर राजकारण चालत आले होते. महाविकास आघाडीच्या शेवटच्या घटका मोजत असताना औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामकरण करण्यात आले. यानंतर शिंदे आणि फडणवीस या युती सरकारमध्ये दोन्ही शहरांचे नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने अंतिम मंजुरीसाठी त्याबाबतचे पत्र २० ऑक्टोबर २०२२ रोजी केंद्र सरकारकडे पाठविले होते. औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केल्याचा प्रस्ताव केंद्र सरकारतर्फे ता. २४ फेब्रुवारी रोजी मंजूर करण्यात आला. त्यानंतर औरंगाबाद शहराचे किंवा जिल्ह्याचे नाव बदलले यावरून प्रश्न निर्माण झाला होता; मात्र सत्ताधारी पक्षांनी औरंगाबाद शहराचेच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचे नामकरण झाले असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. आजअखेर औरंगाबाद महानगरपालिकेचे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका झाल्याचे परिपत्रक मनपा आयुक्त तथा प्रशासक यांनी काढले आहे.

या परिपत्रकामध्ये म्हटले आहे की, याद्वारे सर्व विभागप्रमुख / शाखाप्रमुख यांना कळविण्यात येते की, संदर्भीय अधिसूचनेद्वारे ‘औरंगाबाद महानगरपालिके’चे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका’ असे करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने महानगरपालिकेचे नियमित कार्यालयीन कामकाज करताना आणि सर्व चल व अचल मालमत्तांवरील, नामफलकांवर ‘औरंगाबाद महानगरपालिका’ऐवजी ‘छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका’ असा वापर सुरू करण्यात यावा.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा