Shivaji Maharaj’s Rule:इतिहास आहे, तसा तो सांगितला पाहिजे. इतिहासात छेडछाड केली, तर कर्तृत्त्ववान राजे, महाराजांचा पराक्रम जसा झाकोळला जातो. काही व्यक्तिमत्वे अन्यायकारक होती, त्यांनी प्रजेचा छळ केला, हे ही वास्तवाने समोर आल्याशिवाय त्यांचा वध का केला, हे पुढे येत नाही. अन्यायी राजांनाच या भूमीत गाडले, इथे त्याची कबर आहे, हा इतिहास पुढच्या पिढ्यांना कळला पाहिजे. अन्यायकारक राजांच्या कबरी फोडण्याची भाषा करून आपल्या राजांचा इतिहास आपण पुसतो आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीपासून दूर जातो आहोत, याचे भान ठेवायला हवे. ते भान नसल्याने केलेल्या वक्तव्यातून नागपूरसारख्या दंगली उसळतात.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य कोणा एका धर्माचे किंवा जातीचे नव्हते, ते रयतेचे राज्य होते. शिवाजी महाराजांच्या मावळ्यात सर्व जाती, धर्माचे लोक होते. कपटी आणि स्वराज्यविरोधी स्वकीयांची त्यांनी तमा बाळगली नाही, तसेच मृत्यूनंतर वैर संपते, अशी शिकवणही शिवाजी महाराजांनी आपल्या वर्तनातून दिली; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना जातीच्या आणि एका धर्माच्या कोंदणात बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिवाजी महाराज खरेच किती समजले होते, हा संशोधनाचा भाग आहे. रयतेच्या स्वराज्यावर चालून आलेल्या आदिलशाही सरदार अफजलखानाला १० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी ठार केले. यानंतर दुसऱ्या दिवशी रामायणातील ‘मरणान्ता नि वैराणी’ या उक्तीप्रमाणे अफजलखानाच्या मृतदेहाचा दफन विधी त्याच्या इतमामास साजेल अशा प्रकारे केला. यानंतर त्याचे शिर राजगडावर नेऊन बालेकिल्ल्याच्या दरवाजात दफन केले.
एवढ्यावर न थांबता खानाच्या प्रतापगड परिसरातील कबरीला दिवाबत्तीसाठी वार्षिक उत्पन्नाची व्यवस्था करून दिल्याचे उल्लेख ‘प्रतापगडचे युद्ध’ या कॅप्टन ग. वा. मोडक लिखित पुस्तकात आहे; परंतु असे असताना काही वर्षे अफजलखानाच्या कबरीवरून वाद झाला होता. आता गेल्या काही वर्षांपासून औरंगजेबाच्या खुलताबाद येथील कबरीवरून वाद सुरू झाला आहे. कबर उद्ध्वस्त करण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासारख्या संघटना पुढे आल्या आहेत. त्यात नीतेश राणे यांच्यासारखे मंत्री आगीत तेल ओतत आहे.
‘थिंक टँक’ असलेल्या सुनील देवधर यांची मती कुंठीत झाली आहे. रामायणाची शिकवणही हे विसरले आहेत. अफजलखानाची कबर म्हणजे शिवछत्रपतींचा पराक्रम, उच्चकोटीचा मानवतावाद आणि धर्मनिरपेक्षतेची साक्षीदार आहे. किंबहुना ती शिवछत्रपतींच्या जीवन कार्यातील उद्दात्त अशी कृती आहे. शिवछत्रपती परधर्म सहिष्णू होते; मात्र त्याचा गैरफायदा घेऊन अनधिकृत गोष्टी करणे चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे राज्य गिळंकृत करण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रात आला; परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला सळो की पळो करून सोडले. संभाजी महाराजांचा क्रूरपणे वध केल्यानंतरही महाराणी ताराबाई यांच्या सैन्यातील संताजी-धनाजीने औरंगजेबाच्या सैन्याची एवढी धूळधाण केली, की त्याचा तत्कालीन अहमदनगरमध्ये मृत्यू झाला. त्याचा हा इतिहास आपण पुसणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे.
अहमदनगरमध्ये मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाची कबर खुलताबादला का झाली,हा अनेकांना प्रश्न पडला आहे. औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवल्यानुसार त्याची कबर त्याच्या गुरूच्या कबरी शेजारी बांधण्यात आली. त्याचा खर्च त्याने त्याच्या स्वतःच्या उत्पन्नातून करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याने त्याच्या कबरीवर तुळस लावण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार, तशी कबर बांधण्यात आली. ही कबर अतिशय साधी होती. दोनशे वर्षे तिथे काहीच झाले नाही. लॉर्ड कर्झन यांच्या काळात कबरीजवळ सुशोभीकरण करण्यात आले. त्यानंतरच्या दोनशे वर्षातही त्यावर वाद झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आतापर्यंतच्या वंशजांनी कबर हटवण्याची मागणी केली नव्हती. छावा चित्रपटानंतर काहींच्या भावना तापल्या. अतिशय राग आला, तरी शिवाजी महाराज शांत राहून त्यातून कसा मार्ग काढत होते, याचा विसर पडला. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण न करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका म्हणजे जणू कबर उद्ध्वस्त करण्याचा परवाना मिळाल्यासारखे काही नेते वागायला लागले आहेत.
त्यातून अनेकांचे नुकसान होते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. खुलदाबाद पूर्वी सुफी संताचे ठिकाण होते. तिथे अनेकांच्या कबरी आहेत. त्यामुळे तिथे वर्षभर मुस्लिमांची गर्दी असते. खुलताबादला भद्रा मारुती मंदिर आहे. वेरूळपासून हे ठिकाण जवळ आहे. त्यामुळे आता या स्थळाला पर्यटनस्थळाचे महत्त्व आले आहे. त्यावर हिंदू-मुस्लिम व्यापाऱ्यांची रोजीरोटी चालते. शिवजयंतीत मुस्लिम सहभागी होतात, तर सुफी संतांच्या उत्सवात हिंदू सहभागी होतात; परंतु आता कबरीच्या वादाचा तिथल्या सामाजिक सौहार्दावर परिणाम झाला आहे. त्यातच अफवांमुळे राज्य अशांत आहे. मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी राजकारण्यांचा हा खटाटोप चालू आहे. त्यातून धार्मिक विद्वेषाला खतपाणी मिळते आहे. खुलदाबादमधील त्याची कबर महाराष्ट्रातील राजकीय वादळाचे केंद्रबिंदू बनली आहे. १७०७ मध्ये त्याचे निधन झाले, तेव्हा त्याला शेख जैनुद्दीन यांच्या दर्ग्याजवळ दफन करण्यात आले. ते त्याचे आध्यात्मिक मार्गदर्शक आणि धार्मिक शिक्षकदेखील होते. त्याची अचिन्हांकित कबर छत्रपती संभाजीनगरपासून सुमारे २४ किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्या निधनाला चार शतकांहून अधिक काळ झाला असला, तरी आधुनिक भारतात वाद निर्माण करण्यात त्याचा वाटा उल्लेखनीय आहे.
तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीला श्रद्धांजली वाहण्यासाठी भेट दिली, तेव्हापासून हा वाद गाजतो आहे. औरंगजेबानेच मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. ती हटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आ. प्रसाद लाड यांनी दिला होता. औरंगजेबची कबर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. मोदी सरकार प्रवेश नियंत्रित करू शकते, प्रतिबंधित करू शकते किंवा बंदीदेखील घालू शकते; परंतु ते तसे करीत नाही. औरंगजेब कबरीच्या वादावरून सोमवारी रात्री नागपूरच्या महाल परिसरात हिंसाचार उसळला. विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाचा पुतळा जाळला आणि त्याची कबर पाडण्याची मागणी केली. यानंतर दगडफेक आणि तोडफोड सुरू झाली.दंगलखोरांनी घरांवर दगडफेक केली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना आग लावली. पोलिसांवरही हल्ला झाला. कुऱ्हाडीच्या हल्ल्यात पोलिस उपायुक्त निकेतन कदम जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि ५५ हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात ही घटना घडली. दगडफेक करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी लाठीमार केला. महाल परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. काही लोकांनी घराच्या आत दगडफेक केली. वाहनांचे नुकसान झाले. जमावाने दोन जेसीबी पेटवून दिल्या. दगडफेकीत पोलिस जखमी झाले आहेत. दंगलखोर चेहरे झाकून आले होते. गेल्या आठवड्यापासून कबरीवरून वाद सुरू असताना राज्यात असे काही होईल, याची माहिती मिळवण्यात गुप्तचर यंत्रणाही अपयशी ठरली.दंगलखोरांच्या.हातात तलवारी, काठ्या आणि बाटल्या होत्या. अचानक सर्वांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
हिंसाचारानंतर शहरातील गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांती नगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर भागात संचारबंदी लागू करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईत पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. अर्थात ही पश्चातबुद्धी आहे. दरम्यान भाजपचे ‘थिंक टँक’ मानले जाणारे नेते सुनील देवधर यांनी औरंगजेबाच्या कबरेवर थुंकण्याची व्यवस्था करा अशी मागणी सरकारकडे केली आहे. यामुळे समाजात तणाव आणखी वाढला. खा. उदयनराजे भोसले, मंत्री नीतेश राणे, भाजप नेत्या नवनीत राणा यांनी औरंगजेबाची कबर काढून घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि नेते औरंगजेबाची कबर काढून घेण्याची मागणी करत असतील तर मग अडचण काय? पुरातत्व खात्यासाठी औरंगजेबाची कबर ही संरक्षित स्मारक आहे.
त्याची सुरक्षा करणे हे त्याचे कर्तव्य आहे. पुरातत्व खाते केंद्र सरकारच्या अखत्यारित येते, त्यामुळे औरंगजेबाची कबर काढायचीच असेल, तर त्याबाबत केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल. नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला गालबोट लागले आहे. जाणून बुजून दोन समाजात द्वेष पसरवणे, भांडण लावणे हे उद्योग केले जात आहेत. भावनिक मुद्दयावर राजकीय पोळी भाजताना महापुरुषांच्या विचाराला तिलांजली दिली जात आहे.
भागा वरखाडे, न्यूज अनकट प्रतिनिधी