ऑस्ट्रेलियाचा अडीच दिवसांत पुन्हा पराभव; टीम इंडियाची दिल्लीतही ‘दबंग’ कामगिरी, जडेजाची अप्रतिम गोलंदाजी

पुणे, १९ फेब्रुवारी २०२३ : टीम इंडियाने दिल्लीतही नागपूरच्या कथेची पुनरावृत्ती केली आहे. घरच्या मैदानावर कसे खेळायचे आणि कसोटी सामने कसे जिंकायचे, याचा धडा शिकविताना टीम इंडियाने ‘दबंग’ कामगिरी करीत आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ११५ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने केवळ ४ विकेट्स गमावून पूर्ण केले. आणि सामना ६ विकेटने जिंकला.

तसे, ऑस्ट्रेलियाने थोडा चांगला खेळ केला असता, तर दिल्लीतील त्याची कहाणी वेगळी असू शकली असती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सामना आपल्या पकडीत असल्याचे दिसत होते. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांची धावसंख्या १ बाद ६२ धावा अशी होती; पण तिसऱ्या दिवशी मैदानावर उतरताच ऑस्ट्रेलियाचे अवघ्या ५२ धावांत ९ फलंदाज बाद झाले ज्यात अश्विन आणि जडेजाचा मोठा वाटा होता.

दिल्ली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पहिले सत्र संपण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव आटोपला. ऑस्ट्रेलियाने १८.२ षटके खेळली आणि तिसऱ्या दिवशी स्कोअर बोर्डात केवळ ५२ धावा जोडल्या आणि ९ विकेट गमावल्या. या ९ विकेट्सपैकी ४ विकेट्स त्यांच्या अवघ्या १ धावेवर पडल्या. याशिवाय कांगारू फलंदाजांना स्वीप शॉट्स खेळण्याचाही फटका सहन करावा लागला. या प्रकरणात त्यांच्या ६ फलंदाजांना दुसऱ्या डावात पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले

दिल्लीतील या मोठ्या विजयासह भारत कसोटी क्रमवारीतही अव्वल क्रमांकाचा संघ बनला आहे. ऑस्ट्रेलियाकडून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची दुसरी कसोटी जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाला कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. यासह भारत आता क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन संघ बनला आहे. याशिवाय दिल्लीवर विजय मिळवून भारतीय संघाने २०१० पासून घरच्या मैदानावर २०० पेक्षा कमी धावांचा पाठलाग करताना १०० टक्के विजयाचा विक्रमही कायम ठेवला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा