पुणे, २२ जानेवारी २०२३ : नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमेला लागून असल्याने या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात संक्रांतीच्या दिवशी पतंग महोत्सव साजरा केला जातो. त्याचबरोबर यादरम्यान येथेही बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. त्याचबरोबर पतंग उडविणारे हौशी या मांजाची चोरून खरेदी देखील करीत असतात; मात्र हा मांजा खूप घातक असून, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गेल्या १५ वर्षांपासून संक्रांत संपल्यानंतर नंदुरबार येथील युसूफ खान मोहम्मद खान नावाचा हा अवलिया शहरातील मांजा गोळा करीत असतो. नेमका त्याचा उपक्रम काय ते आपण पाहूया.
नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सवाची धूम पाहण्यास मिळत असते. घराच्या गच्चीवर उंच इमारतींवर डीजे लावून पतंग महोत्सव साजरा केला जातो. पतंग उडविताना पतंग कट होतात व त्या पतंगाला असलेला मांजा हा रस्त्यावर, झाडांवर, घरांवर अडकतो आणि त्यामुळे बरेच अपघात आपल्याला पाहायला मिळतात; तसेच त्या अपघातांमध्ये मृत्यू झालेले देखील आपण पाहिलेले आहेत.
पतंगाचा मांजा घातक असल्याने; तसेच पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि मांजामुळे कोणाला दुखापत होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील युसूफ खान मोहम्मद खान नावाचा हा
अवलिया मांजा गोळा करतो. नेहमीप्रमाणे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी नंदुरबार शहरातील चिराग गल्लीतील रहिवासी युसूफ खान मोहम्मद खान हे स्वतः शहरात मांजा गोळा करीत असतात. रस्त्यावर पडलेला, झाडावर अडकलेला मांजा ते गोळा करतात ते कोणताही भेदभाव न करता वेळ काढून सामाजिक कार्य करतात.
युसूफ खान मोहम्मद खान यांचे या उपक्रमाचे १६वे वर्ष असून, त्यांनी यावर्षी नंदुरबार शहरातील विविध भागांतून जवळपास २० ते २५ किलो मांजा गोळा केला आहे. रस्त्याने जाणारे-येणारे; तसेच वाहन चालविणारे व पशुपक्षी यांना मांजामुळे मोठ्या प्रमाणात दुखापत होते. त्यामुळे सामाजिक कार्य लक्षात घेता त्यांनी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मांजा गोळा केला. सकाळपासून ते शहरात मांजा गोळा करीत फिरतात. एकूणच पतंग महोत्सव साजरा करताना सुरक्षेची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. पंतंगांच्या घातक मांजामुळे अनेक पक्षी जायबंदी होत असतात. त्यामुळे त्यांचीही काळजी घेतली गेली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील