राज्यात डोळ्यांच्या संसर्ग रुग्णसंख्येत मोठी वाढ, प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन

पुणे, ९ ऑगस्ट २०२३ : राज्यात मागील काही दिवसांपासून साथीचे आजार फोफावत असल्याचे दिसून येते आहे. महाराष्ट्रात सुमारे अडीच लाख लोकांना डोळ्याचा संसर्ग झाल्यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात डोळ्यांच्या साथीचे अनेक रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. पुणे जिल्ह्यात १६,१०५ रुग्ण असून पिंपरी-चिंचवडमध्ये ४,४४५ रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यात साथीचा आजार पसरल्याने या साथीमुळे अनेकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे.

राज्यात डोळ्यांच्या संसर्ग रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत २ लाख ४८ हजार ८५१ रुग्ण या आजाराने बाधित झाले आहेत. पुणे जिल्ह्यात १६, १०५ रुग्ण असून पिंपरी-चिंचवडमध्ये ४,४४५ रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. ऍडिनो व्हायरसमुळे डोळे येण्याचा संसर्ग होतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हा सौम्य संसर्ग असला, तरी एका व्यक्तीला डोळे आले तर संपर्कात आलेल्या दुसऱ्याला याची लागण होण्याची शक्यता आहे. राज्यातील बुलढाणा, जळगाव, पुणे, नांदेड, अमरावती, अकोला या जिल्ह्यांत डोळे येण्याची साथ अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

नाशिक शहरात साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या शहरात डोळ्यांची साथ सुरू असून, गेल्या दहा दिवसांत महापालिकेच्या रुग्णालयात आणि उपकेंद्रात ३६०० रुग्णांची नोंद झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता महापालिकेचा वैद्यकीय विभाग देखील सतर्क झाला आहे. खाजगी रुग्णालय किंवा मेडिकल मधून ड्रॉप आणि औषध घेऊन उपचार करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, घाबरून जाऊ नये, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर