आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन

पुणे, ११ ऑगस्ट २०२१: आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी मोठं कार्य केलं. तांबे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वृत्त ‘सकाळ’ने दिलं आहे. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

योग आणि आयुर्वेद यांची सांगड घालत सामाजिक परिवर्तनासाठी गेली कित्येक वर्षं ते कार्यरत होते. विविध वृत्तपत्र, मासिकं आणि इतर माध्यमांतून या विषयातलं प्रबोधन करत असत. आतापर्यंत त्यांनी या विषयांवर शेकडो लेख लिहिले. आयुर्वैदाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं मोठं कार्य त्यांनी गेली अनेक वर्षं केलं.

लोणावळ्याजवळील कार्ला येथील आत्मसंतूलन व्हिलेज या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. अनेक आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी उपचार केले. विविध आयुर्वेदिक औषधांची संशोधन करुन त्यांनी निर्मितीही केली. त्यांच्या देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली

आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा