पुणे हादरवणाऱ्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता या रक्तरंजित प्रकरणात आरोपी सोम्या उर्फ सोमनाथ गायकवाडचे नाव पुढे आले असून, त्याच्यावरही आंदेकर टोळीची टेहळणी असल्याची माहिती उघड झाली आहे. या अपडेटमुळे पोलिस तपास अधिक चुरशीचा झाला आहे.
दरम्यान, पोलिसांनी आंदेकर टोळीच्या सदस्यांच्या स्थावर-जंगम मालमत्तेवर तपासाची छापणी सुरू केली असून, कृष्णा आंदेकरसह फरार आरोपींचा शोध जोरात घेतला जात आहे. विशेष म्हणजे, विशेष ‘मकोका’ न्यायालयाने अटक आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे यांच्या पोलिस कोठडीची मुदत वाढवून थेट २२ सप्टेंबरपर्यंत केली आहे.
आयुषचा खून हा साधासुधा नव्हता. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा असल्याने, या घटनेने शहरभर खळबळ उडवली. आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर हिने दिलेल्या तक्रारीनुसार, आंदेकर टोळीच्या म्होरक्यासह तब्बल १३ आरोपींवर खुनाचा गुन्हा नोंदवून ‘मकोका’खाली कारवाई करण्यात आली आहे.
शुक्रवारी (१२ सप्टेंबर) आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर, पोलिसांनी कोर्टात तपासाची प्रगती मांडली. विशेष सरकारी वकील विलास पठारे यांनी आरोपींना अधिक चौकशीसाठी कोठडीची गरज असल्याचे सांगितले, तर आरोपींच्या वकिलांनी “पुरेशी चौकशी झाली आहे, न्यायालयीन कोठडी द्यावी” असा दावा केला. मात्र, न्यायालयाने पोलिसांची बाजू मान्य करत दोघांच्या कोठडीत तब्बल दहा दिवसांची वाढ केली.
या सर्व घडामोडींमुळे पुण्याच्या गुन्हेगारी जगतातील तापमान प्रचंड वाढले असून, आंदेकर टोळीची मालमत्ता, शत्रुत्व आणि गुप्त डावपेच यामुळे पुढील काही दिवस शहरात आणखी झटके बसण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील












































