विलगिकरणासाठी आझम कॅम्पसच्या मशीद इमारतीचा संपूर्ण मजला देणार

पुणे, दि.१मे २०२०: पुण्यातील मध्यवर्ती पेठांमधील कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती लक्षात घेता कॅम्प,भवानी पेठ, नाना पेठला लागून असणाऱ्या आझम कॅम्पसच्या इमारतींमधील जागा संशयित रुग्णांच्या क्वारंटाईनसाठी प्रशासनाला देण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शवली होती, हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वीकारला असून तसे पत्र कॅम्पसचे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांना दिले आहे.

प्रशासनाच्या पत्रानंतर ही जागा ताब्यात देण्यासाठी स्वच्छता आणि सुविधांची तयारी बुधवारपासून सुरु झाली आहे. आझम कॅम्पस मधील प्रार्थना स्थळाच्या पहिल्या मजल्यावरील ९ हजार चौरस फुट जागा सर्व वीज, पंखे, स्वच्छतागृह, पार्किंग सुविधांसह देण्याची तयारी येथील व्यवस्थापनाने दर्शवली होती. येथे आलेल्या संशयित रुग्णांची नाश्ता,जेवणाची व्यवस्था करण्याची,पोलीस बंदोबस्त आणि शासकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याची तयारी असल्याचे जिल्हाधिका-यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते.

आझम कॅम्पसमधील शैक्षणिक सुविधा पूर्ववत सुरु होईपर्यंत ही जागा शासनाला उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे या पत्रात म्हटले होते. त्यानुसार सर्व सुविधांसह हा मजला तयार झाला आहे.

आझम कॅम्पस परिसरामध्ये महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ३० शैक्षणिक अस्थापना असून २४ एकरमध्ये हा परिसर आहे. त्यातील एका भागात पूर्वीपासून मशीद आहे. या मशिदीतील पहिल्या मजल्यावर ९ हजार चौरस फुटाचा सभागृहासारखा मजला आहे. त्याचे रुपांतर क्वारांटाइन वार्डमध्ये करता येणे शक्य आहे. येथील शैक्षणिक इमारतींमधील शाळा, महाविद्यालये सध्या बंद आहेत. लागेल तेव्हा आणखी जागा देण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनासमोर आहे,असेही डॉ.पी ए इनामदार यांनी सांगितले.

रमजानच्या पवित्र महिन्यात मशिदींमध्ये न जाता घरीच नमाज पठण करण्याचे आवाहनही डॉ पी ए इनामदार यांनी केले आहे.
कॅम्पस मधील युनानी मेडिकल कॉलेजचे २५ डॉक्टर्स ५ रुग्ण वाहीकांमधून पेठांमध्ये रुग्ण सेवा करीत आहेत. तसेच आझम कॅम्पसने आतापर्यंत २५ लाखाहून अधिक किमतीचे किराणा सामान गरजूंना वितरीत करण्यात आले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा