बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांनी केली आत्महत्या…

मुंबई, ३० नोव्हेंबर २०२०: बाबा आमटे यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे यांचं सोमवारी पहाटे निधन झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार – त्यांनी विष पिऊन आत्महत्या केलीय. त्यांच्या निधनानंतर, अशी माहिती समोर येत आहे की, एका आठवड्यापूर्वी त्यांनी सीईओ असलेल्या त्याच संस्थेत आर्थिक अनियमिततेचा आरोप करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. तथापि, त्यांनी अवघ्या दोन तासांत व्हिडिओ हटविला.

शीतल यांच्या आरोपावरून आमटे कुटुंबाचे स्पष्टीकरण

बाबा आमटे यांचे पुत्र तसेच त्यांचा हा वारसा पुढे नेणारे विकास आणि प्रकाश आमटे तसेच या दोघांच्या पत्नी भारती आणि मंदाकिनी आमटे यांच्या वतीने हे आरोप फेटाळून लावण्यात आले. यामध्ये त्यांनी शितल यांनी केलेले आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. शीतल विकास आमटे यांची मुलगी होती. आमटे कुटुंबानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘महारोगी सेवा समिती, वरोरा ही देशातील एक मोठी सामाजिक सेवा संस्था आहे. यानं वंचितांच्या विकासास दिशा व प्रेरणा दिली आहे. येथे कोट्यवधी समाजसेवकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे.’

त्यांनी स्पष्ट करत म्हटलं आहे की, ‘आमटेंच्या तीन पिढ्या या कामात व्यस्त आहेत. शीतल आमटे करजगी यांनी महारोगी सेवा समितीच्या काम, ट्रस्टी व कामगारांविषयी अनुचित वक्तव्य केलं आहे. शितल बऱ्याच काळापासून तणाव आणि डिप्रेशनचा सामना करत होत्या. त्यांच्या सर्व टिप्पण्या निराधार आहेत. शीतल यांच्या आरोपामुळं कोणताही गैरसमज होऊ नये यासाठी आमटे कुटुंब हे परस्पर चर्चेनंतर हे विधान जारी करत आहे.’

त्यात पुढं म्हटलं आहे की, “आम्हाला आमच्या सर्व लाभार्थी, कामगार आणि मित्र पक्षांना हे आश्वासन द्यायचं आहे की संस्थेचं कार्य गेल्या सात दशकांच्या परंपरेचं पालन करत राहील आणि लोकांना कोणत्याही चुकीच्या प्रचारावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करत आहोत. ”

कुटुंबीयांच्या या निवेदनानंतर शीतल आणि गौतम कराजगी यांनी एका निवेदनात म्हटलं होतं की, ‘आजोबा बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी आम्हाला जे शिकवलं त्या विचारांशी आम्ही बांधील आहोत. योग्य वेळी आम्ही या प्रकरणात तपशीलवार निवेदन देऊ. आम्ही लोकांना आमच्यावर विश्वास ठेवण्याची विनंती करतो.’

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा