‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’वरून उमटू लागले पडसाद

पुणे, १४ डिसेंबर २०२२ : सर्वोत्कृष्ट अनुवादासाठी अनघा लेले यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला देण्यात आलेला पुरस्कार सरकारने तडकाफडकी मागे घेतल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. लेखक प्रा. शरद बाविस्कर यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार नाकारल्यानंतर आता लेखक आनंद करंदीकर यांनीही त्यांना देण्यात आलेला पुरस्कार नाकारला आहे; तसेच डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. हेरंब कुलकर्णी यांनीही राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे; तसेच आज ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनीही भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

कोबाड गांधी लिखित आणि अनघा लेले यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकास राज्य शासनाने दिलेला पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय जीआर काढून घेतला. त्यानंतर पुरोगामी लेखकांकडून निषेधाचा सूर उमटत आहे. लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी राज्य सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर ‘भुरा’ या कादंबरीचे लेखक शरद बाविस्कर यांनी राज्य सरकारने दिलेला पुरस्कार नाकारायचे ठरवले आहे, तर आनंद करंदीकर यांनी त्यांच्या वैचारिक घुसळण या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार याच कारणास्तव नाकारायचे ठरवले आहे. पुरस्कार वापसीचे हे लोण आता वाढत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अनघा लेले यांच्या भाषांतराला दिलेला पुरस्कार महाराष्ट्र शासनाने रद्द केल्याच्या निषेधार्थ लेखक आनंद करंदीकर यांनी त्यांच्या वैचारिक घुसळण या पुस्तकाला मिळालेला एक लाख रुपयांचा पुरस्कार परत देत असल्याचे शासनाला कळविले आहे.

प्रा. शरद बाविस्कर यांनी पुरस्कार नाकारला
लेखक प्रा. शरद बाविस्कर यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार न स्वीकारण्याची भूमिका घेतली आहे. प्रा. बाविस्कर यांना ‘भुरा’ या आत्मकथनास लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या भूमिकेवर टीका करीत त्यांनी आपण हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा