लोणी काळभोर: दि. १४ सप्टेंबर २०२०
फुरसुंगी, लोणी काळभोर, कदम वाकवस्ती या तीन्ही गावांच्या शिवेवरील असणाऱ्या पांडवदंड रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्षच दिसून येत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याचे काम झालेले नाही रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच या रस्त्यावर दिवसेदिवस अतिक्रमण वाढत आहे.
तसेच रस्त्याच्या कडेला दुतर्फा झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. त्यामुळे रस्त्याची रुंंदी कमी झाली आहे. रूंदी कमी झाल्याने दोन वाहने एकावेळी रस्त्यावर बसत नाहीत. दुचाकी घसरून अपघात होत आहेत. त्याचप्रमाणे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात प्लॉटींग झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत.
वाळु, सिमेंट लोखंड यासारख्या बांधकाम क्षेत्रात लागणाऱ्या मटेरिअलची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु आहे. तसेच हडपसर सासवड रोड कडून पुणे सोलापूर महामार्गाला जोडणारा कमी अंतराचा मार्ग असल्याने या रस्त्याने रात्रंदिवस वाहतूक सुरु आहे. त्याचप्रमाणे फुरसुंगी गावात मोठ्या प्रमाणात गोडाऊन असल्याने तेथील मालाची आवक जावकही या रस्त्याने सुरू असते तसेच कुटीसाठी व गु-हाळासाठी लागणाऱ्या उसाची वाहतूक या रस्त्याने सुरु असते.
त्याचप्रमाणे लोणी काळभोर परिसरातील शेतमाल मांजरी उपबाजारकडे तसेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती कडे नेण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. सद्यपरीस्थितीत या रस्त्यावर झालेले प्लॉटींगचे रस्ते हे या रस्त्याच्या दुपटीने मोठे आहेत या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने दोन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी नागरीकांना वीस ते पंचवीस मिनिटे लागतात. यामुळे नागरिकांना पाठीचे आजार ,मणक्याचे आजार जडत आहेत.
नागरीकांचे वाहनांचे नुकसान होत आहे. लोकप्रतिनिंधी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. तरी महापालिका प्रशासनान, तसेच शिरुर आणि पुरंदर या दोन्ही आमदारांनी या रस्त्याची पाहणी करुन रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करुन हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी स्थानिक नागरीकांमधून व्यक्त होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे