बडे जटाधारी महादेव मंदिर खेडी फाटा परिसरात महाशिवपुराण कथेचे निरुपण, कोणत्याही पदावर काम करा मात्र संस्कार नका सोडू – पंडित मिश्रा

13

जळगाव ८ डिसेंबर २०२३ : कोणी जिल्हाधिकारी असो, न्यायाधीश कोणी मंत्री, डॉक्टर- इंजिनिअर किंवा कोणत्याही क्षेत्रात कोठेही कार्यरत असाल मात्र आपले संस्कार कधीच सोडू नका असा उपदेश प्रख्यात कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी गुरुवार ७ रोजी उपस्थित लाखो भाविकांना केला. बडे जटाधारी महादेव मंदिर खेडी फाटा परिसरात महाशिवपुराण कथेचे निरुपण करताना ते बोलत होते. कथा श्रवण करण्यासाठी तिसऱ्या दिवशीही लाखो भाविकांचा जनसागर उसळला होता. समाजाला त्रासदायक ठरत असलेल्या वाईट गोष्टींवरही पंडित मिश्रा यांनी आपल्या वाणीतून कडक शब्दात परंतु सर्वाना समजेल,अशा भाषेत मर्मावर बोट ठेवले.

तुम्ही वाईट मार्गाने पैसे धन कमावून घरी आणा, असे ना तुमची पत्नी तुम्हाला सांगते ना तुमची मुले तुम्हाला सांगतात. खोटं कोणी केलं, छल-कपट मग कोण करतय, बेईमानी कोणी केलीय. या वाईट कर्माचे भागीदार कुटुंबातील कोणताच सदस्य दायीत्व घेणार नाही. वाईट कर्म तुमच्या नावावर लिहिले जात आहेत. आताच ते सोडून द्या. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप होईल. मृत्यू झाल्याबरोबर जीवनातील कर्माची फाईल उघडेल. मग त्याठिकाणी तुमची डॉक्टरकि, इंजिनिअर, मंत्री, पदाधिकारी किंवा उच्च पदवीदेखील निरर्थक ठरेल,असे अनमोल विचार पंडित प्रदीप मिश्रा यांनी उपस्थितांसमोर मांडले. आज मॉल, दुकान, बंगला अशा कितीतरी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. कारण काय? चोऱ्या होवू नये. पण तरीदेखील चोऱ्या होतच आहेत. परंतु समस्त मानव-प्राणीमात्रांना जन्म देवून परमात्म्याने पृथ्वीवर पाठविले. एकही कॅमेरा त्याने नाही लावला. मृत्यू झाल्याबरोबरच त्याच्याकडे पूर्ण कर्माची फाईलच उघडून जाते.

मुलीचा विवाह करण्याबाबत संकल्प ,प्रश्न अथवा अट ठेवण्याचा पूर्ण अधिकार पित्याला आहे. आणि असा संकल्प प्रत्येक मुलीच्या वडिलांनी केला पाहिजे. पूर्वीच्या काळी राजे मुलीचा विवाह करताना स्वयंवर रचत होते. जो बलशाही आणि जो वाईट गोष्टीपासून लांब आहे, असा स्वयंवर जिंकत होता. तोच मुलीचा सन्मान राखेल,असा विश्वास त्यात होता. सोबत गाय, रामायण ग्रंथ दिले जात होते. त्यांचा उद्देश हाच होता की, यातील पात्रांसारखे तुला सासरी माणसे भेटतील. पण तु खंबीर रहा. सगळ्यांचा आदर ठेव,अशी शिकवण देत होते. मुलगा शोधताना त्याचे चारित्र्य -संस्कार तपासले पाहिजे,असा उपदेश त्यांनी दिला.
आज कालचे मुलीचे वडिल मुलाची कमाई किती, वर्षाचे पॅकेज किती हे बघतात. किती पॅकेज ८ लाख १० लाख, परंतु पॅकेज कमावणारा तरुण मित्रांना घेवून बसतो. आणि पॅकेजचे पैसे मौजमजेत करण्यात उडवितो. या पॅकेजला कसले आले मोल? काही मुलीचे वडिल नोकरीवाला मुलगा शोधतात. कारण काय? मुलगी स्वयंपाक करणार नाही. कोणाची गुलामी करणार नाही. मुलगा आणि मुलगी दोघे कमावतील. सासरच्या लोकांशी काही मतलब नाही, हे सर्वार्थाने अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, पूर्वीच्या काळात मोठे कुटुंबात मुलगी दिली जायची. कारण काय? मुलीला थोडा त्रास झाला तर कुटुंबातील इतर सदस्यांजवळ मन मोकळं करता येत असायचं. ते समजून घेत तिच्या पाठीशी उभे राहत असायचे. पण आज काय चित्र दिसते? आज काय दिसते हम दो हमारे दो! थोडंस भांडण झालं की मुलगी अश्रू गाळते. त्यानंतर फारकत घेते. आज न्यायालयात सर्वाधिक फारकत घेण्याच्या केसेस दाखल आहेत. हम दो हमारे दो, रिश्तेनाते फेक दो. यातून चांगले नाही घडत, असे वास्तव त्यांनी भाविकांसमोर मांडले

बडे महादेव मंदिर परिसरात होत असलेल्या या शिवमहापुराण कथेच्या आयोजनामुळे जळगावकरांवर भोलेबाबांची दया होत आहे. शिवाने कृपा केली आहे. मनाने ही कथा श्रवण करा. येण्या जाण्यात आणि बसण्यासाठी कष्ट होत असेल तर ते सहन करा. परंतु आपल्याला याचा जीवनात लाभच लाभ होईल. ज्या घरात आई असते त्या घरातील मुले संस्कारातून मोठे होत जातात. ते चारित्र्याने घडतात. ज्ञानप्राप्ती बरोबरच ते चांगल्या पध्दतीने जीवन जगतात. परंतु लहानपणीच ज्यांनी आई गमावली तेही मोठे होतात. परंतु हे मुले संस्कारापासून लांब असतात. यासाठी मुलांच्या जीवनात आई असणे खूपच आवश्यक आणि जरुरीचे आहे, असे सांगत पंडित मिश्रा यांनी जीवनात दान धर्म साधनादेखील आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : डॉ.पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा