नवी दिल्ली, १५ मार्च २०२३ : नोकरीच्या बदल्यात जमिनी घेतल्याच्या घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव, पत्नी राबडी देवी यांच्यासह त्यांच्या परिवारातल्या काही सदस्यांची चौकशी सुरू होती; मात्र आता सर्व आरोपींना याप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे.
दिल्ली न्यायालयाने माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांची मुलगी-आरजेडी खासदार मीसा भारती आणि इतर आरोपींना जामीन मंजूर केला. ‘सीबीआय’ने अटक न करता आरोपपत्र दाखल केल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने प्रत्येक आरोपीला ५०,००० रुपयांचे वैयक्तिक जामीन बॉण्ड आणि तेवढीच रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले.
लालूप्रसाद यादव यांनी आपल्या रेल्वेमंत्रिपदाच्या काळामध्ये नोकरी देण्याच्या बदल्यात लोकांकडून जमिनी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी ‘सीबीआय’ने गेल्या वर्षी १८ मे रोजी लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर याच महिन्यात ‘सीबीआय’ने राबडी देवी, त्यांची मुलगी आणि खासदार मीसा भारती यांच्या घरी छापेमारी केली. तसेच लालूप्रसाद यादव यांची चौकशीही केली. त्यानंतर लगेचच ‘ईडी’च्या पथकाने तेजस्वी यादव, त्यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या घरी छापेमारी करीत मालमत्ता जप्त केली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील