पुणे, 11 जुलै 2022: देशातील सर्वात लोकप्रिय बाइकपैकी एक असलेली बजाज पल्सर आता पूर्वीपेक्षा महाग झाली आहे. बजाज ऑटोने जुलैपासून आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये कंपनीची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बजाज चेतकचाही समावेश आहे. जाणून घेऊया आता किती आहेत दर…
बजाज मॉडेल्सच्या किमती वाढल्या
जेव्हा नवीन तिमाही सुरू होते, तेव्हा सहसा सर्व वाहन कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती सुधारतात. बजाज ऑटोने जुलै-सप्टेंबर तिमाही सुरू होताच आपल्या वेगवेगळ्या दुचाकींच्या किमतीही वाढवल्या आहेत. बजाजच्या बहुतांश मॉडेल्सच्या किमतीत केवळ एक ते तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय.
बजाज ऑटोच्या सर्वात स्वस्त बाईक्स पैकी एक असलेल्या CT110X ने आता 1.29% म्हणजेच 845 रुपयांची वाढ केलीय. पूर्वी ही बाईक 65,453 रुपयांना मिळायची आणि आता तिची एक्स-शोरूम किंमत 66,298 रुपये झालीय. त्याचप्रमाणे, बजाज प्लॅटिना 100 ES ड्रम व्हेरिएंटची किंमत आता 65,491 रुपयांऐवजी 66,317 रुपये असेल. तर या बाईकच्या डिस्क ब्रेक व्हर्जनची किंमत आता 69,216 रुपये असेल.
कंपनी बजाज पल्सर ब्रँड अंतर्गत 125cc ते 250cc मोटारसायकली विकते. या सर्व मॉडेल्सबद्दल बोलायचं झालं तर 125cc चे दोनच मॉडेल्स असे आहेत की कंपनीने किंमत पूर्वीप्रमाणेच ठेवली आहे. पल्सर 125 ड्रम सिंगल सीट आणि स्प्लिट सीट या दोन्हींची किंमत अनुक्रमे 81,389 आणि 84,000 रुपये आहे. त्याच वेळी, पल्सर 125 डिस्क सिंगल सीट आणि स्प्लिट सीटची किंमत 1,101 रुपयांनी वाढलीय. Pulsar NS 125 ने या सेगमेंटच्या बाइक्समध्ये सर्वाधिक म्हणजे 1,165 रुपयांची वाढ केलीय.
त्याचप्रमाणं बजाज पल्सरच्या इतर मॉडेल्सच्या किमती 717 रुपयांवरून 1299 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. तर Dominar आणि Avenger च्या किमतीतही वाढ झालीय.
बजाज चेतक महागली
बजाजच्या कोणत्याही वाहनाच्या किमतीत सर्वात जास्त वाढ झाली असेल तर ती त्याची इलेक्ट्रिक स्कूटर बजाज चेतक आहे. जुलैमध्ये तिची किंमत 12,749 रुपयांनी वाढली आहे. आता ती 1.41 लाखांऐवजी 1.54 लाख रुपये होईल. कंपनीचं म्हणणं आहे की किमतीत वाढ झाल्यामुळं त्यांनी आपल्या मॉडेल्सच्या किमतीत बदल केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे