पुणे,६ जुलै २०२३ : पुण्यातील तळेगावमधील डॉ.डी.वाय.पाटील महाविद्यालयातील महिला स्वच्छता गृहामध्ये सीसीटीव्ही आहेत, असा आरोप झाल्यानंतर आता महाविद्यालयामध्ये ख्रिश्चन समाजाची प्रार्थना का घेतली जाते? असा आरोप बजरंग दलाने केला आहे. हे दोन्ही आरोप करून प्राचार्य अलेक्झांडर यांना मारहाणही झाली आहे. या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले असुन हा प्रकार लवकर थांबवा आणि प्राचार्यांची बदली करा, अशी मागणी केली जात आहे.
पुण्यातील तळेगावमधील महाविद्यालयात महिला स्वच्छता गृहामध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विद्यार्थिनींच्या पालकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. याबाबत काही संघटनांनी महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना जाब विचारला आणि त्यांच्यावर हात ही उचलला आहे. त्यानंतर कपडे फाटलेल्या अवस्थेत असतानाचा प्रचार्यांचा व्हिडीओ ही समोर आला. महिला स्वच्छता गृहामध्ये सीसीटीव्ही लावण्यासोबतच विविध आरोप प्राचार्य अलेक्झांडर यांच्यावर करण्यात आले आहेत.
या प्राचार्यांची महाविद्यालयातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. महाविद्यालयात असा गोंधळ उडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर दुसरीकडे मावळ तहसीलदारांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. महाविद्यालय प्रशासनाने मात्र याबाबत मौन बाळगले आहे. त्यामुळे महिला स्वच्छता गृहामध्ये सीसीटीव्ही नेमके कोणत्या कारणासाठी बसवण्यात आले होते? यासंदर्भात अजूनही स्पष्टीकरण नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर