अहमदाबाद , ५ जानेवारी २०२३ : अहमदाबाद शहरातील वस्त्रापूर भागातील अल्फा वन मॉलमधील एका थिएटरमध्ये शाहरुख खान स्टारर पठाण या चित्रपटाचे पोस्टर फाडून निषेध केल्याने बुधवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना काही काळ ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही.
याबाबत माहिती देताना गुजरात विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते हितेंद्र सिंह राजपूत म्हणाले की, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना चित्रपटगृहात पठाण चित्रपटाचे पोस्टर चिकटवण्यात आल्याचे समजले. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ नये म्हणून हे निषेध करण्यात आला होता आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
वस्त्रापूर पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर जे. के डांगर यांनी सांगितले की, बजरंग दलाचे १० ते १२ लोक वस्त्रापूरमधील अल्फा वन मॉलच्या थिएटरमध्ये पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडण्यासाठी गेले होते. त्यांनी चित्रपटाचे पोस्टर फाडले, हाणामारी करत त्यांनी बाहेर येऊन चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात निदर्शने केली. या सोबतच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशा इशाराही यावेळी त्यांनी दिला. तसेच जय श्री राम चा जयघोष करण्यात आला. त्यापैकी ५ तै ६ जणांना ताब्यात घेऊन दीड तासानंतर सोडून दिले.याबाबत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.
दरम्यान, शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारीला देशभर प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीला काही संघटनांनी विरोध केला आहे. भगव्या रंगाच्या बिकिनीवरुन ‘पठाण’ सिनेमा बॅन करण्याचीही मागणी होत आहे. सध्या सोशल मीडियावर या सर्व प्रकरणात दोन गट पडलेले दिसून येत आहेत. यामध्ये काहींनी पठणला समर्थन दिले आहे तर काहींनी जोरदार विरोध केला आहे. अशातच आता पठाण विरोधात बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.