पुण्यात आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगाणार भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा ‘ट्वेंटी-२०’ सामना

पुणे, ५ जानेवारी २०२३ : श्रीलंकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांत ३ सामन्यांची ‘ट्वेंटी-२०’ मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरी लढत पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होणार आहे. मुंबईतील पहिल्या सामन्यात भारताने २ धावांनी विजय मिळवून मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली.

पहिल्या सामन्यात भारताचे अनेक फलंदाज अपयशी ठरले होते; पण जलद गोलंदाजांनी कमाल केली आणि विजय मिळविला. भारताच्या फिरकी गोलंदाजांना फार कमाल करता आली नव्हती. टीम इंडियाला दुसऱ्या लढतीत या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल.

यातून होणार संघनिवड
भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), पथुम निशांका, अविष्का फर्नांडो, सदिरा समराविक्रम, कुशल मेंडिस, भानुका राजपक्षे, चारिथ असलंका, धनंजय डी. सिल्वा, वानिंदू हसरंगा, महिष तिक्षाना, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसून रजिथा, दुनिथ वेलगे, प्रमोद मुधुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.

आजचा सामना
स्थळ : एमसीए स्टेडियम, गुहुंजे, पुणे.
वेळ : सायंकाळी ७ वाजता.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क, डीडी स्पोर्टस्वर

भारत-श्रीलंका सामन्यासाठी बालेवाडी ते गहुंजे ई-बसची सोय
गहुंजे मैदानावर आज गुरुवारी (ता. ५) सायंकाळी होणाऱ्या भारत-श्रीलंका ‘ट्वेंटी-२०’ सामान्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) साध्या दरात बालेवाडी मैदानापासून दोन ई-बस सोडल्या आहेत; तसेच गहुंजे पार्किंगपासून ते मैदानापर्यंत जाण्यासाठीही बसची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेट सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांना फायदा होणार आहे.

गहुंजे येथील मैदानावर जाण्यासाठी बालेवाडी येथून गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता पहिली ई-बस असेल. तर चार वाजता दुसरी ई-बस सुटणार आहे. या ई-बसला २५ रुपये तिकीट दर असणार आहे. क्रिकेट सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना येण्या-जाण्यासाठी पर्यावरणपूरक व वातानुकूलित बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबरोबरच गहुंजे मैदान येथील पार्किंग येथे वाहने लावून नागरिकांना मैदानापर्यंत चालत जावे लागते. त्यामुळे ‘पीएमपी’ने पार्किंगपासून ते मैदानापर्यंत बसची सेवा सुरू केली आहे. यासाठी दहा रुपये तिकीट दर असणार आहे. या सेवेचा प्रेक्षकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन ‘पीएमपी’कडून करण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा