बालगंधर्व रंगमंदिराचे पार्किंग आता हॉटेलच्या ताब्यात?

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या पार्किंगचा वापर आता बाहेरील एका खासगी हॉटेलसाठी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे महापालिकेने ठेकेदाराला दिलेल्या या पार्किंगमध्ये बालगंधर्व येथे येणाऱ्या नागरिकांऐवजी थेट शेजारच्या हॉटेलच्या गाड्या पार्क केल्या जात आहेत. यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी येणाऱ्या प्रेक्षकांची मोठी गैरसोय होत आहे. ही घटना समोर आल्यानंतर पुणे महापालिकेने तात्काळ संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे.

या प्रकाराबद्दल व्हिडिओही व्हायरल झाला असून, त्यात हॉटेलचे कर्मचारी हे पार्किंग त्यांच्यासाठी विकत घेतल्याचा दावा करताना दिसत आहेत. यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्यास ठेका रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे पालिकेच्या सांस्कृतिक विभागाने सांगितले आहे. या प्रकारामुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले