बाळासाहेबांचा आवाज, हिंदवी तोफ अन् शिंदेंनी शेअर केला ‘शिवसेना दसरा मेळाव्याचा’ टीझर केला प्रदर्शित

मुंबई, ३० सप्टेंबर २०२२ : राज्यातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे वेध लागले आहेत. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. दोन्ही गटांकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याचे पोस्टर समोर आले. आता शिंदेंनी त्यांच्या ५ ऑक्टोबर रोजी बीकेसी मैदानावर होणा-या दसरा मेळाव्याचा टीझर शेअर केला आहे. त्याआधी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे पोस्टर प्रसिद्ध केले होते. या पोस्टरमधून शिंदे गटाने धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरेंवर आपला हक्क असल्याचं दाखवून दिलं.

याचे टीझर अतिशय भव्य असून ‘टीझरच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारुढ मूर्ती दिसते. त्यानंतर बाळासाहेबांचा मूर्ती आणि शेवटी एकनाथ शिंदेंची मूर्ती सदृश्य प्रतिमा दिसते. व्हॉइस ओव्हरमध्ये बाळासाहेबांच्या आवाजात, “शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत आणि सातत्याने अस्मानात फडकत राहिला पाहिजे,” हे वाक्य ऐकू येतं. तसेच शेवटी, “जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम्” हे सुद्धा बाळासाहेबांच्या आवाजातच ऐकू येतं. “एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य,” अशी ओळ त्यानंतर झळकताना दिसते. मुख्यमंत्र्यांच्या फोटोजवळच ‘एकलव्य’ हा शब्द झळकताना दिसतो. असा हा टीझर सध्या सर्व पक्षीय चर्चेचा विषय झाला आहे.

खरी शिवसेना कोणाची…याचा निकाल निवडणूक आयोग लावणार आहे. त्यापूर्वीच शिंदे गटाने आपल्या मेळाव्याला ‘शिवसेनेचा मेळावा’ असं म्हटलं आहे.

शिवसेनेची ओळख असणारा डरकाळी फोडणारा वाघ आणि त्याच्या बाजूला, “गर्व से कहो हम हिंदू हैं” हे वाक्यही टीझरमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे, “शिवसेनेचा दसरा मेळावा.. हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार…” अशा ओळीही या टीझरमधील फोटोवर दिसतात. हा टीझर अवघ्या २० सेकंदांचा आहे. शिंदेंनी हा टीझर पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांमध्ये त्याला हजारोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत.

मात्र खरी शिवसेना कोणती? कोण होणार शिवसेनेचा वाली? खरा एकलव्य कोण ? या प्रश्नांची उत्तरे मिळायला वेळ लागेल. पण तोपर्यंत आपले अस्तित्व दाखवणे हे मुख्यमंत्र्यांना गरजेचे आहे, हे मात्र खरं.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा