पुणे ,२४ एप्रिल २०२०:
दिवसागणिक कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. देशात पूर्ण लॉक डाउन आहे त्याच बरोबर राज्यातही तीच स्थिती आहे. लॉकडाउनच्या काळात पूर्ण राज्यात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर इतर सर्व उद्योग बंद आहेत. पण अशात जगाचा पोशिंदा शेतकरी मात्र सगळ्यांसाठी शेतात राबत आहे, याकडे कोणाचेही लक्ष नाही. इतर वेळीही दुर्लक्षित राहिलेला हा पोशिंदा या काळातसुद्धा लोकांच्या नजरेत आलेला नाही.
अश्याच एका शेतकऱ्याने आपली व्यथा आता सरकारसमोर मांडली आहे. ग्रामीण भागात आज देखील दिवसा वीजपुरवठा बंद असतो. परिणामी पाणी पुरवठा करणारी मोटार चालत नाही. पण दुसरीकडे शहरी भागात लोकांना लॉकडाऊनच्या काळात लोकांना करमणूक म्हणून अखंडित वीजपुरवठा चालू आहे. इतर वेळी उद्योग धंद्यांमुळे शहरात वीजपुरवठा चालू असणे गरजेचे आहे. मात्र सध्या शेतकरी सगळ्यांच्या भुकेची जाणीव ठेवत दिवस रात्र राबत आहे पण त्याला आवश्यक सुविधा देखील मिळत नाहीत. किमान कोरोनाच्या काळात तरी सरकारने दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.