नागपंचमी निमीत्त नागाचे प्रदर्शन करण्यास बंदी: वनपरिक्षेत्र अधिकारी, मुकेश सनस

हडपसर, दि. २१ जुलै २०२०: नागपंचमीचा सण शनिवारी दि. २५ जुलै रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने शहरी व ग्रामीण भागात नाग अथवा सापांच्या प्रदर्शनास बंदी घालण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार नागपंचमीच्या सणानिमित्त सापाचे प्रदर्शन करणे अथवा सापांचा खेळ करण्यास प्रवृत्त करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

असे प्रकार कोठे आढळल्यास निसर्गप्रेमींनी व नागरिकांनी वनविभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नाग व सापांचे प्रदर्शन वा खेळ करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

श्रावणातील नागपंचमी हा सण महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी नागांची पूजा केली जाते. सार्वजनिक ठिकाणी त्यांचे प्रदर्शन केले जाते. नागपंचमीच्या सणानिमित्त सापाला अथवा नागाला भक्तीभावाने दूध पाजले जाते. मात्र, सापाला दूध अपायकारक असल्याने सापाला दूध न पाजण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले. तसेच सापांच्या जीवाला धोका उत्पन्न होईल, अशा कृत्यासही मज्जाव करावा वनविभागाची फिरती पथके या दिवशी लक्ष ठेवणार आहेत.

जगात सापांच्या ३ हजार ७५ जाती आढळतात. भारतात यापैकी २८२ जाती आढळतात. त्यामधील ७२ प्रकारचे साप हे विषारी असतात. सर्पमित्रांना साप पकडण्यासाठी लायसन्स दिले आहेत. फक्त याच सर्पमित्रांना विविध ठिकाणी धोकादायक अवस्थेत असणारे साप पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यास परवानगी आहे.

सापांचे विविध प्रकार

समुद्री साप, पट्टेरी पोवळा, चापडा हे विषारी साप महाराष्ट्रातील विविध भागात आढळतात.

बिनविषारी साप : अजगर, धामण, तस्कर, गवत्या, पाणसाप, दिवड, वाळा सर्प, हरणटोळ, नाणेटी इत्यादी प्रकारचे बिनविषारी सापही आढळतात.

गैरसमज

साप दूध पितो असा गैरसमज आहे. साप दूध पीत नाही. सापाला दूध पाजल्यास त्याला त्रास होतो. प्रसंगी प्राणासही मुकावे लागते. सापाला कान नसतात त्यामुळे साप संगीताच्या तालावर डोलतो हाही गैरसमजच आहे.

नागपंचमीला अशी पूजा करा…..

नागपंचमीच्या दिवशी नागाच्या मूर्तीची पूजा करून नागपंचमी साजरी करा. नाग तसेच सर्व सापांचे रक्षण करा. सापाला दूध किंवा अन्य पदार्थ पाजण्याचा प्रयत्न करू नका. नागपंचमीच्यानिमित्ताने सापाला किंवा नागाला त्रास होईल, असे कोणतेही कृत्य करू नका. निसर्गाची जीवसाखळी रक्षणाचा प्रयत्न करा. असे बोलताना वनपरिक्षेत्र अधिकारी पुणे, मुकेश सनस यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा