नेपाळमध्ये भारतीय चित्रपटांवरील बंदी उठवली, आदिपुरुष वर बंदी कायम

काठमांडू, नेपाळ २५ जून २०२३: वादग्रस्त आदिपुरुष चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी कायम ठेवत, सेन्सॉर बोर्डाने पास केलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन रोखले जाणार नाही, असे नेपाळच्या न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे सर्व हिंदी चित्रपटांचे शो पुन्हा सुरू झाले आहेत. नेपाळमध्ये काही ठिकाणी असलेली बॉलिवूड चित्रपटांवरील बंदी आता उठवण्यात आली आहे.

आदिपुरुष वादाचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता काही माहिती मिळाली. त्यानुसार कळते की, नेपाळची राजधानी काठमांडू येथे आदिपुरुषाच्या रिलीजवर आक्षेप घेण्यात आला होता. कारण चित्रपटाच्या एका दृश्यात, सीतेचे वर्णन भारताची कन्या म्हणून केले गेले होते, जे काठमांडूचे महापौर बालेंद्र शाह यांना आवडले नाही. कारण सीता मातेचा जन्म भारतात नसून नेपाळमधील जनकपूरमध्ये झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून वाद निर्माण झाला होता, त्यानंतर सरसकट सर्व हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती.

या प्रकरणावर अल्पकालीन आदेश जारी करताना नेपाळच्या पाटण उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धीर बहादूर चंद म्हणाले, ज्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाकडून प्रदर्शनाची परवानगी मिळाली आहे ते थांबवू नयेत. आमचा विश्वास आहे की कोणतीही व्यक्ती देश किंवा राष्ट्रहितापेक्षा वर नाही. नेपाळच्या कायद्याचे पालन करून स्वतंत्रपणे आपला व्यवसाय चालू ठेवणे हा सगळ्यांचा अधिकार आहे. परंतु हिंदी चित्रपटांवरील बंदी उठवली असली तरी चित्रपटगृहांचे मालक अजूनही आदिपुरुष प्रदर्शित करण्याच्या बाजूने नाहीत.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा