“बांगला देश” ची निर्मिती

१९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध व त्यातून जगाच्या नकाशावर बांगला देश या नव्या देशाची निर्मिती हा भारताच्या इतिहासातील एक सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस आहे. या युद्धाला भारताच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आज १६ डिसेंबर युद्धाचा विजय दिवस साजरा होत आहे. आपल्या मातृभूमीसाठी शहीद झालेल्या त्या सर्व शूरवीरांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाला कोटी-कोटी प्रणाम करूयात…

१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री जन्मलेल्या पाकिस्तानचे भौगोलिक रचनेमुळे पूर्वपाकिस्तान व पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग झाले होते. लोकसंख्येच्या दृष्टीने पूर्व पाकिस्तान मोठा होता. मात्र अनेक बाबींमध्ये राजकीय नेत्यांची पूर्वपाकिस्तानशी असलेली वागणूक सापत्न भावाची होती.
पूर्व पाकिस्तानी जनतेने जवळपास २३ वर्षे हा भेदभाव सहन करावा लागला.
मात्र १९७० मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर परिस्थिती बदलत गेली. या निवडणुकीत अवामी लीगने पूर्व पाकिस्तानातील १६९ पैकी १६७ जागा जिंकत ३१३ सदस्य संख्या असलेल्या पाकिस्तानी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बहुमत मिळविले होते.
भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सीमावर्ती राज्यांमधून निर्वासितांसाठी छावण्या उभारल्या. भारतीय अर्थव्यवस्थेवर याचा प्रचंड ताण पडू लागला.
पूर्व व पश्चिम पाकिस्तानमधील हा तणाव दूर व्हावा यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक आवाहने केली. परंतु त्यास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २७ मार्च १९७१ या दिवशी पूर्वपाकिस्तानच्या स्वातंत्र्य लढय़ाला भारत सरकारचा पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
पूर्व पाकिस्तानातून येणार्‍या निर्वासितांना आश्रय देत राहण्याऐवजी थेट लष्करी कारवाई करून पाकिस्तानी लष्कराचा बीमोड करण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात भारतातील नेतेमंडळींनी घेतला.
१९७१ च्या या युद्धाची ओळख भारत-पाक युद्ध म्हणून न होता, “बांगलादेशाचा स्वातंत्र्यलढा’ म्हणून हे युद्ध ओळखले जावे अशी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची इच्छा होती.
मात्र दुसर्‍या महायुद्धासह ५ मोठ्या युद्धांमध्ये पराक्रम गाजवणारे फिल्ड मार्शल सॅम ‘बहादूर’ माणेक शॉ हे खर्‍या अर्थाने १९७१ च्या भारत-पाक युद्धाचे शिल्पकार होते. पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधींची युद्धात जी भूमिका होती तीच भूमिका फिल्ड मार्शल युद्धभूमीवर बजावत होते.
पूर्व पाकिस्तानातील सर्वसामान्य जनतेने पुकारलेल्या चळवळीत पाकिस्तानी लष्करातील बंडखोर अधिकारी व सैनिक सहभागी होते. १९७१ च्या युद्धात भारतीय सैन्याच्या नेतृत्वाखालील मित्र वाहिनीला या मुक्ती वाहिनीने सहकार्य केले.
भारत पाक सीमेवर राजस्थानच्या मैदानात असलेल्या लोंगिवाला या चौकीवर पाकिस्तानने ४ डिसेंबर १९७१ च्या संध्याकाळी हल्ला केला. ६५ रणगाडे व २८०० सैनिकांनी चढवलेला हा हल्ला, भारतीय तुकडीचे मेजर कुलदीपसिंग यांनी अवघ्या १२० जवानांच्या साथीने दुसर्‍या सकाळी वायुदलाची मदत मिळेपर्यंत थोपवला.
वायुदलाने प्रतिहल्ला करताच पाक सैनिकांनी पळ काढला. १९७१ च्या युद्धात तिसर्‍याच दिवशी मिळालेला हा विजय भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. लष्करी बलाबल ३ लाख ६५ हजार सैनिकांच्या बळावर पाकिस्तानने हे युद्ध पुकारले होते.
भारतीय सैन्य व मुक्तीवाहिनी असे मिळून सुमारे ५ लाख सैनिक या युद्धात लढत होते. भारताचे ४ हजार जवान या युद्धात शहीद झाले तर पाकिस्तानच्या १० हजार सैनिकांना भारतीय फौजेने कंठस्नान घातले.
युद्धात भारताच्या पूर्व किनार्‍यावर होणार्‍या संभाव्य हल्ल्याचा बीमोड करण्यासाठी आयएनएस ही विमानवाहू युद्धनौका बंगालच्या उपसागरात तैनात केली होती. यावरील लढाऊ विमानांनी शत्रूच्या पूर्व पाकिस्तानातील लष्करी छावण्या उद्ध्वस्त केल्या.
या युद्धनौकेवर ताबा मिळवण्याचा पाकचा डाव होता. मात्र त्यांची पीएनएस गाझी ही पाणबुडी विशाखापट्टणमजवळ समुद्रात बुडवून भारतीय लष्कराने पाकच्या मनसुब्यांवर पाणी फिरवले.
२ लाख ६९ हजार बांगलादेशी नागरिकांचे पाकिस्तानने शिरकाण केले. विद्यार्थी, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर या वर्गातील नागरिकांना पाक फौजांनी लक्ष्य केले. १ कोटी बांगलादेशी नागरिकांनी जिवाच्या भीतीने भारतात आश्रय घेतला होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा