बँक संप : या महिन्यात बँकांचा संप होण्याची शक्यता, उरकून घ्या आपली बँकिंग संबंधित कामं

नवी दिल्ली, 9 जून 2022: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (पीएसयू बँक) कर्मचाऱ्यांनी या महिन्याच्या अखेरीस संपावर जाण्याचा इशारा दिलाय. त्यामुळं तुम्ही बँकिंगशी संबंधित कोणतेही काम पुढे ढकलत असाल तर ते त्वरित हाताळा. आपल्या मागण्यांसाठी 27 जून रोजी संपावर जाऊ शकतात, असे कर्मचारी संघटनांनी सांगितलं. आठवड्यातील पाच दिवस कामाचे दिवस आणि पेन्शनचा प्रश्न सोडवावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

जुनी पेन्शन पूर्ववत करण्याची मागणी

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU), ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स (NOBW) या नऊ बँक युनियनची संयुक्त संस्था, संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी यूएफबीयूच्या बैठकीनंतर सांगितलं की त्यांच्या मागण्यांमध्ये पेन्शनधारकांसाठी पेन्शन योजनेत बदल करणं आणि सर्व बँक कर्मचाऱ्यांसाठी जुनी राष्ट्रीय पेन्शन योजना पुनर्संचयित करणं समाविष्ट आहे. एआयबीओसीचे सरचिटणीस सौम्या दत्ता यांनी सांगितलं की, 27 जून रोजी देशभरातील सुमारे सात लाख कर्मचारी संपात सामील होतील.

नवीन आणि जुनी पेन्शन योजना यातील फरक

जुनी पेन्शन योजना (OPS) मध्ये कर्मचार्‍याच्या मूळ पगाराच्या अर्धी रक्कम निवृत्तीच्या वेळी पेन्शन म्हणून दिली जाते. याशिवाय पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणतीही कपात केली जात नाही. तसेच, 20 लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी रक्कम उपलब्ध आहे. जुन्या योजनेत सामान्य भविष्य निर्वाह निधी म्हणजेच जीपीएफची तरतूद आहे.

नवीन पेन्शन योजनेत (NPS) कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या 10% आणि DA कापला जातो. यामध्ये सहा महिन्यांनंतर डीए मिळण्याची तरतूद नाही. निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनचीही हमी नाही. या योजनेत निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन मिळविण्यासाठी एनपीएस फंडातील 40 टक्के रक्कम गुंतवावी लागते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा