कोपरगाव, १३ फेब्रुवारी २०२३ : नगरपरिषदेमार्फत वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षात १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आक्रमक झालेल्या कोपरगाव नगरपालिकेने ढोल बजाव करीत विशेष वसुली मोहीम सुरू केली. पाठोपाठ शहरातील मुख्य चौकामध्ये थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर झळकल्याने शहरात एकच खळखळ उडाली आहे.
दरम्यान, या बॅनरबाजीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून, या बॅनरला कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे. नगरपरिषदेकडून २०२२-२३ या आर्थिक वर्षासह थकबाकीचा १० कोटी मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यापारी संकुल दुकानभाडे, मोबाईल टॉवर जागाभाडे आदींच्या वसुलीसाठी झोननिहाय वसुली पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या वसुली मोहिमेसाठी पालिकेने ढोल बजाव करीत रणशिंग फुंकले होते.
नगरपालिकेने वसुलीसाठी शहरातील चौकाचौकांत थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर लावले होते. पालिकेच्या या बॅनरबाजीचे तीव्र पडसाद उमटले असून, याचा तीव्र शब्दांत निषेध करीत रस्त्यावर उतरलेल्या शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी बॅनरला काळे फासले व आपल्या भावना व्यक्त केल्या. तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सांगितले, की जे नागरिक व व्यापारी या मोहिमेत नगरपालिकेचा कर भरणार नाहीत अशांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर