बाप्पा तुमच्या भेटीला! पुण्यातील मानाचा कसबा गणपती

पुणे, २३ ऑगस्ट २०२०: आजचा आपला पहिला बप्पा आहे कसबा गणपती. ‘बाप्पा तुमच्या भेटीला’ या सदरामध्ये आम्ही आपल्याला पुण्यातील मानाचे पाच गणपती तसेच इतर महत्त्वाचे गणपती रोज दाखवणार आहोत. त्याचबरोबर त्याविषयी रोचक माहिती देखील आमच्या पोर्टलवर उपलब्ध करून देणार आहोत. याच भागाअंतर्गत आज आपण कसबा गणपती विषयी माहिती घेणार आहोत. तसेच या गणपतीचे दर्शन तुम्हाला व्हिडिओ स्वरुपात देखील उपलब्ध करून दिले गेले आहे.

कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे. हा गणपती मिरवणुकीत सगळ्यात पहिला असतो. अर्थातच हा पुण्यातील पहिला मानाचा गणपती मानला जातो. इतकेच नव्हे तर पुण्याचे आराध्यदैवत देखील मानला जातो.
या गणपतीची स्थापना स्वराज्याच्या राजमाता जिजाऊ यांनी केली होती. जिजाऊ आणि बाल शिवाजी जेव्हा पुण्यात वास्तव्यास आले होते त्यावेळी त्यांना ही गणेशाची मूर्ती आढळली होती. जिजाऊसाहेबांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना करून ते मंदिर बांधले तेव्हापासून ते आजपर्यंत हा गणपती पुणेकरांसाठी पहिला मानाचा गणपती आहे.

हा गणपती एका दगडी गाभार्‍यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे. गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणून या गणपतीला ’जयति गणपति’ असे म्हणतात.

आजही घरात होणार्‍या मंगल कार्याची पहिली अर्पणपत्रिका या गणपतीपुढे ठेवण्यात येते आणि लग्नकार्य पार पडल्यावर वधूवरांना लगेचच या गणपतीच्या दर्शनाला आणतात. या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे. पुण्याला गणपतीचं शहर म्हंटल जात. जुन्या काळी गणपतीचे कार्यक्रम शनिवारवाड्यात होत असे. मंदिरास लाकडी सभामंडप असून उजव्या बाजूस ओवऱ्या दिसतात. १८ व्या शतकानंतर पेठेची विशेष वाढ झाली. कस्ब या फारसी शब्दापासून कसबा शब्द आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा