बाप्पांच्या प्रसादाला लिलावात लाखोंची बोली, हैदराबाद मधील बालापुर येथे लाडूचा लिलाव

हैदराबाद, दि; ९ सप्टेंबर २०२२ ; महाराष्ट्रा बरोबरच देशभर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भाविक गणरायाला निरोप देताना आपल्या श्रद्धेनुसार गणरायाचे नित्य पूजा पाठासाठी प्रसाद स्वरूपात काही ना काही मिळावे याची आस आपल्या मनी बाळगून असतात. यामध्ये कोणी गणरायाचे उपरणे ,दहा दिवस पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या गणपतीच्या वेगवेगळ्या वस्तू मिळण्यासाठी आतुर असतात. परंतु हैदराबाद मधील बालापुर येथे, बाप्पांच्या प्रसादाच्या लाडूचा लिलाव करण्यात आला. भाविकांनी प्रसादाचा लाडू मिळवण्यासाठी लाखो रुपयांची बोली लावली.

हैदराबाद येथील प्रसिद्ध बालापुर गणपतीच्या, प्रसादातील लाडूची विक्री झालीआहे. तब्बल २४ लाख ६० हजार एवढ्या उच्चांकी, किमतीला या प्रसादाच्या लाडूची विक्री करण्यात आली.कोणाही माणसाच्या तळहातावर हा लाडू मावणार नाही. या लाडूचे वजन तब्बल २१ किलो एवढे आहे. लिलावामध्ये बोली लावून तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते व्ही लक्ष्मी रेड्डी यांनी हा लिलाव जिंकला. दरवर्षी गणेश विसर्जना दिवशी हा लिलाव होतो.

हैदराबाद येथील या लाडूच्या लिलावामागे भक्तांचा रंजक इतिहास आहे. १९९४ पासून या ठिकाणी ही परंपरा चालू आहे.सुरुवातिला एका भक्ताने ४५० रुपयात सर्वात आधी बालापूर येथील गणपतीचा प्रसादाचालाडू खरेदी केला. त्यानंतर दरवर्षी लाडूचा लीलाव करूनच विकण्यात येतो. ज्या भाविकाला हा लाडू मिळतो त्याला नशीबवान समजले जाते. लिलावा दिवशी आंध्र प्रदेश सह तेलंगणातील लोक बोली लावण्यासाठी येथे येतात.

देशामध्ये कोरोनाचे संकट सुरू असताना, पाठीमागील दोन वर्ष लिलावाचा कार्यक्रम बंद होता.या काळात बालापूर गणपतीचा प्रसादाचालाडू राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याकडे देण्यात येत होता. लिलावाच्या कार्यक्रमातून दरवर्षी जमा होणाऱ्या रकमेतून ठराविक रक्कम पुढील वर्षीच्या गणेशोत्सवासाठी शिल्लक ठेवण्यात येते. तर उर्वरित रक्कम बालापूरमधील समाज विधायक कामांसाठी वापरण्यात येते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा