बारामती झाली कोरोना मुक्त; रेडमधून जाणार ऑरेंज झोनमध्ये 

बारामती, दि.३०एप्रिल २०२०: बारामतीत उपचार सुरु असलेल्या एका कोरोनाग्रस्तानेही कोरोनावर मात केली असल्याचे गुरुवारी (दि. ३०) स्पष्ट झाले. परिणामी आजच्या घडीला बारामती कोरोनामुक्त झाली आहे. अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी ही माहिती दिली.

गेल्या महिनाभरापासून बारामतीकरांची कोरोनाशी लढाई सुरु होती. शहरातील श्रीरामनगर भागात एका रिक्षा चालकाला कोरोना झाल्याचे २९ मार्च रोजी स्पष्ट झाले होते. तो रुग्ण उपचारानंतर आता तो ठणठणीत आहे. त्यानंतर समर्थनगर भागातील एका भाजी विक्रेत्याला कोरोना झाला. त्याचा मुलगा, सून व दोन नाती यांनाही कोरोनाने गाठले. यात भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला. परंतु त्याच्या कुटुंबातील अन्य चौघांनी कोरोनावर यशस्वी मात केली. औंध रुग्णालयातून उपचारानंतर परतल्यावर फुलांच्या वर्षावात त्यांचे स्वागत झाले होते.

दरम्यान शहरातील म्हाडा कॉलनी भागातील एक ज्येष्ठ व्यक्ति कोरोना संक्रमित झाला होता. त्याच्यावर आज अखेर उपचार सुरु होते. परंतु त्यांनीही कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांची दुसरी व तिसरी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. शहरात सातपैकी एकाचा मृत्यू झाला तर अन्य सहाजणानी कोरोनावर यशस्वी मात केली. म्हाडा कॉलनीतील रुग्णालाही लवकरच गुरुवारी ससूनमधून सोडण्यात आले.

तालुक्याच्या ग्रामीण भागात माळेगावात एक कोरोना संक्रमित आढळला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या संपर्कातील अन्य अकरा जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. या रुग्णाने १६ एप्रिल रोजीच बारामती सोडत उपचारासाठी पुणे गाठले होते. त्यामुळे या भागातील प्रतिबंधीत क्षेत्राचा कालावधी गुरुवारी (दि. ३०) संपला. त्यामुळे महिनाभरातच बारामती पॅटर्नच्या जोरावर तालुका कोरोनामुक्त झाला आहे.

बारामती ऑरेंज झोनमध्ये…

बारामती तालुक्यात कोरोनाचे आठ रुग्ण सापडल्याने तालुका रेड झोनमध्ये गेला होता. परंतु आठपैकी दोघांचा मृत्यू झाल्यावर अन्य सहाजण कोरोनामुक्त झाले आहेत. आज अखेर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे बारामती रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये प्रवेश करेल.
– डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा