बारामतीत माथेफिरूने केला ज्येष्ठाचा खून 

बारामती : बारामती येथे एका माथेफिरुने डोक्यात दगड घालत सोपान सावळाराम जगताप (वय ७०, रा. संत सेना महाराज नगर,कसबा, बारामती) या ज्येष्ठाचा खून केला.  शहरातील कसबा भागात क-हा नदीच्या पात्रात रविवारी (दि.१९) सायंकाळी ही घटना घडली. 

याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी गणेश मारुती कुंभार (वय ३२) या माथेफिरुला ताब्यात घेतले आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , शहरातील अप्पासाहेब पवार मार्गावरुन  क-हा नदीच्या जुन्या पुलावरुन जगताप हे कसब्यातील मशिदीच्या बाजूकडे निघाले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या कुंभार याने त्यांना नदी पात्रात ढकलून देत तेथे पडलेला एक दगड उचलून जगताप यांच्या डोक्यात घातला. ही घटना परिसरातील काहीनी पाहताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत जगताप यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 
घटनेनंतर लागलीच पोलिसांनी कुंभार याला ताब्यात घेतले. गेल्या काही महिन्यांपासून त्याने कसबा भागात अनेकांना त्रास दिला आहे. रात्रीच्या अंधारात दबा धरुन हल्ला करणे, दगड भिरकावणे अशी कृत्ये त्याने यापूर्वीही केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

                                                                                            प्रतिनिधी -अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा